हुपरीत उपोषण, बंद

By Admin | Updated: May 29, 2015 23:47 IST2015-05-29T22:13:07+5:302015-05-29T23:47:47+5:30

नगरपालिकेची मागणी : शासकीय कार्यालये बंद पाडण्याचा इशारा

Upstream fasting, shutdown | हुपरीत उपोषण, बंद

हुपरीत उपोषण, बंद

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे शासनाने लवकरात लवकर नगरपालिकेची स्थापना करावी, या मागणीसाठी नगरपालिका कृती समितीच्या वतीने शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला शहरातील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार बंद ठेऊन पाठिंबा दर्शविला. विविध पक्षांच्या सुमारे ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
दरम्यान, १५ जूनअखेरपर्यंत शासनाने नगरपालिकेची उद्घोषणा करावी, अन्यथा शहरातील सर्व शासकीय कार्यालये बंद पाडण्याबरोबरच उग्र स्वरूपाची आंदोलने उभारण्यात येतील, असा निर्धार यावेळी कृती समितीच्या वतीने निमंत्रक अमजद नदाफ यांनी व्यक्त केला.हुपरी येथे नगरपालिका अस्तित्वात यावी, यासाठी गेल्या ३० वर्षांपासूनची रौप्यनगरीवासीयांची मागणी आहे. मात्र, शासनाने विविध कारणाने अद्यापपर्यंत नगरपालिकेची उद्घोषणा केलेली नाही. सध्या शहराची लोकसंख्या ६० हजारांपेक्षा अधिक झाली असून, इतक्या मोठ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्यामध्ये ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. परिणामी, ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या मागणीसाठी शासनाकडे गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कृती समितीच्यावतीने शुक्रवारपासून विविध प्रकारच्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. कृती समितीच्या वतीने गावभागातील जुना बसस्थानक चौकामध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासोा कांबळे, जि. प. समाजकल्याण सभापती किरणराव कांबळे, माजी जि. प. अध्यक्ष नानासोा गाठ, दौलत पाटील, अशोक खाडे, अजित सुतार, सुदर्शन खाडे, उमर नदाफ, गणेश कोळी, मुबारक शेख, प्रवीण कुंभोजकर, प्रतापसिंह देसाई, विनोद खोत, नितीन गायकवाड, डॉ. सुभाष मधाळे, राजेश राठोड, रघुनाथ नलवडे, बाळासोा बडवे, विलास चव्हाण, मनोज पाटील, महेश कोरवी यांच्यासह ३०० हून अधिकजणांनी सहभाग घेतला.
या उपोषणाला माजी आमदार राजीव आवळे, आरपीआय जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, संजय चौगुले, आदींनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. तसेच आमदार सुजित मिणचेकर, माजी खासदार निवेदिता माने, खासदार धनंजय महाडिक, आदींनी भ्रमणध्वनीवरून उपोषणाला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)

Web Title: Upstream fasting, shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.