सुधारित बातमी - सरळसेवा भरतीसाठी महापोर्टलच्या जागी नव्या चार कंपन्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:06+5:302021-01-25T04:24:06+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने सरळसेवा भरतीसाठी महापोर्टलच्या जागी नव्या चार कंपन्यांची निवड केल्याची माहिती गृह, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री ...

सुधारित बातमी - सरळसेवा भरतीसाठी महापोर्टलच्या जागी नव्या चार कंपन्यांची निवड
कोल्हापूर : राज्य सरकारने सरळसेवा भरतीसाठी महापोर्टलच्या जागी नव्या चार कंपन्यांची निवड केल्याची माहिती गृह, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली.
राज्याच्या विविध विभागांतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या ‘महापोर्टल’ प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत महाविकास आघाडी सरकारने तत्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती.
महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागाने निवड करून सादर केलेल्या माहितीनुसार चार कंपन्यांची निवड करण्यात आली. अॅपटेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड, मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या चार कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
कोविडमुळे झाला विलंब -
दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सक्षम व पारदर्शक पदभरतीप्रणाली उपलब्ध करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. परंतु, अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या कामाला काही प्रमाणात वेळ लागत होता. पदभरतीसाठी सक्षम व पारदर्शकप्रणाली उभी करण्यासाठी राज्य सरकारकडून काढण्यात आलेली टेंडर प्रक्रिया दि. ११ डिसेंबर २०२० रोजी पूर्ण झाली असून, त्या संबंधित शासन निर्णय दि. २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.