जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:32+5:302021-01-08T05:14:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वाधिक ८ ग्रामपंचायती चंदगड तालुक्यातील आहेत. ...

Unopposed 43 gram panchayats in the district | जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायती बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वाधिक ८ ग्रामपंचायती चंदगड तालुक्यातील आहेत. शिरोळ व गगनबावडा तालुक्यात बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी ठरले असले, तरी काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. साम, दाम, दंड या नीतीचा वापर करून अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिनविरोधसाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. गटातटाच्या राजकारणामुळे निवडणुकीत कमालीची इर्षा पाहावयास मिळत आहे. त्यातूनच मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले. ४३३ ग्रामपंचायतींच्या ४०२७ जागांसाठी १५ हजार ८३० अर्ज दाखल झाले होते. इतका राजकीय संघर्ष स्थानिक पातळीवर उफाळून आला आहे. त्यातून काही गावांनी बिनविरोधसाठी अगदी शेवटपर्यत जोरदार प्रयत्न केले. माघारीसाठी ‘शब्दांबरोबरच काही ठिकाणी अर्थपूर्ण घडामोडीही घडल्या आहेत. त्यातून काही ठिकाणी सर्व जागा बिनविरोध करण्यात यश आले. चंदगड तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले. करवीर व आजरा तालुक्यात प्रत्येकी पाच, भुदरगड चार, कागल तीन, तर राधानगरी तालुक्यातील दोन व शाहूवाडी, गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गगनबावडा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या संख्या कमी असली, तरी एकही गाव बिनविरोध हाेऊ शकले नाही. शिरोळमध्ये एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसली, तरी २४ जागा बिनविरोध झाल्या.

तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत बिनविरोध-

तालुका निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत बिनविरोध

कागल ५३ ३ (कुरूकली, वडगाव, गोरंबे)

राधानगरी १९ २ (बुजवडे, बुरंबाळे)

करवीर ५४ ५ (आरे, म्हारूळ, उपवडे, खाटांगळे, चाफोडी)

गडहिंग्लज ५० ६ (गिजवणे, दुगूनवाडी, तेगिनहाळ, इदरगुच्ची, चंदनकूड, सावतवाडी तर्फ नेसरी)

हातकणंगले २१ १(मौजे तासगाव)

आजरा २६ ५ (गवसे, खोराटवाडी, एरंडोल, पेद्रेवाडी, होनेवाडी)

शाहूवाडी ३९ ६(........)

शिरोळ ३३ ०

चंदगड ४१ ८ (म्हालेवाडी, धूमडेवाडी, घुलेवाडी, मलतवाडी, ढोलगरवाडी, केरवडे, मुगळी, कानडी)

भुदरगड ४५ ४ (वासनोली, मुरूकटे, पाटगाव, पाचर्डे)

गगनबावडा ८ ०

पन्हाळा ४१ ३ (उत्रे, अंबार्डे, सोमवारपेठ)

पारंपरिक विरोधी गट एकत्र

अनेक गावांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा निवडणुकीतील पारंपरिक विरोधी गटांचे मनोमीलन झाले आहे; तर काही ठिकाणी पारंपरिक विरोधकांमध्येच लढाई पाहावयास मिळत आहे.

Web Title: Unopposed 43 gram panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.