इचलकरंजीत आजपासून सर्व दुकाने अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:46+5:302021-07-05T04:15:46+5:30
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील सर्व दुकाने आज, सोमवारपासून सुरू करण्याचा निर्धार व्यापारी असोसिएशनने घेतला ...

इचलकरंजीत आजपासून सर्व दुकाने अनलॉक
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील सर्व दुकाने आज, सोमवारपासून सुरू करण्याचा निर्धार व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत दुकाने उघडण्यात येणार आहेत. दुकाने सुरू केल्यानंतर कारवाईसाठी येणाऱ्यांना जशास तसे उत्तर देत सहपरिवार कारवाईस सामोरे जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनास दुकाने उघडत असल्याबाबतचे पत्र दिले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यापाऱ्यांनी आपली दुकाने गेल्या ९० दिवसांहून अधिक काळ बंद ठेवली आहेत. शहरातील पॉझिटिव्हीटी दर कमी होत असून, अद्यापही इतर दुकाने उघडण्यासाठी परवानगी न दिल्याने व्यापाऱ्यांनी सोमवारपासून कोरोनाचे सर्व नियम पाळून सकाळी १० ते ४ या वेळेत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकाने बंद असल्याने दुकानचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार व इतर देणी यामुळे व्यापारी मेटाकुटीला आला आहे. यापूर्वीही अनेक वेळा दुकाने सुरू करण्याचा व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला. प्रशासनाच्या आवाहनाला पाठिंबा देत आणखी काही दिवस दुकाने बंद ठेवली. परंतु आता कोणाशी चर्चा करणार नसून सोमवारपासून दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले.
इनामप्रणीत व्यापारी असोसिएशनतर्फे खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे व नगराध्यक्षा अलका स्वामी यांनाही पत्र देऊन भूमिका स्पष्ट केली आहे. इचलकरंजी व्यापारी असोसिएशनने महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या आजपासून दुकाने सुरू करण्याच्या भूमिकेस पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश दिले असून त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.