अनोळखीचे पैसे पोलिसांच्या स्वाधीन

By Admin | Updated: June 6, 2016 00:49 IST2016-06-06T00:21:51+5:302016-06-06T00:49:06+5:30

कदमवाडीतील तरुण : एसटी स्टँडवर मिळाले होते पन्नास हजार

Unkolized money belongs to the police | अनोळखीचे पैसे पोलिसांच्या स्वाधीन

अनोळखीचे पैसे पोलिसांच्या स्वाधीन

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक येथे खड्याची अंगठी घेण्यासाठी आलेल्या तरुणाकडे अनोळखी व्यक्तीने पन्नास हजार रुपये देऊन निघून गेला. रक्कम कोणी दिली, कशासाठी दिली, हे माहीत नसल्याने त्याने हे पैसे शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. अमोल विजय पवार (वय ३५, रा. कदमवाडी) असे या प्रामाणिक तरुणाचे नाव आहे. घटना चार दिवसांपूर्वी घडली.
माहिती अशी, अमोल पवार यांचे कदमवाडीत ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांच्या सांगलीतील मित्राने दि. ३१ मे रोजी दुपारी मध्यवर्ती बस स्थानकात एक तरुण येईल तो तुला अंगठी देऊन जाईल, असे सांगितले. त्यानुसार पवार हे मध्यवर्ती बस स्थानक येथे जाऊन थांबले. काही वेळाने त्यांच्या समोर मोटारसायकलवरून एक अनोळखी तरुण आला. त्याने त्यांच्या हातामध्ये पन्नास हजार रुपये ठेवले. यावेळी पवार यांनी मित्राला फोन लावतो थांबा, असे म्हटले; परंतु तो तरुण काही न बोलता निघून गेला. त्यांनी मित्राला फोन लावला असता त्याने मी पैसे पाठवून दिलेले नाहीत, अंगठी पाठविली आहे, असे सांगितले. हे ऐकताच पवार यांना धक्काच बसला. पैसे कोणाचे, ते आपल्या हातात देऊन जाणारी व्यक्ती कोण? याबाबत विचार करीत असतानाच काही वेळात एक कारागीर त्यांच्या जवळ आला. तोही अंगठी देऊन निघून गेला. घडलेल्या प्रकाराची माहिती पवार यांनी घरी व मित्रांना दिली. त्यानंतर ते पन्नास हजार रुपये ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात घेऊन आले. याठिकाणी ते पैसे पोलिसांच्या ताब्यात देऊन ते कोणाचे असतील त्यांना द्या, असे सांगून ते निघून गेले. पोलिसांनी तीन दिवस पैसे कोणी घेण्यासाठी येते का याची प्रतीक्षा केली; परंतु पोलिस ठाण्याकडे कोणीच फिरकले नाही. पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल नागरिकांसह पोलिसांनी कौतुक केले. ज्यांनी कोणी हे पैसे दिले असतील त्यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Unkolized money belongs to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.