विद्यापीठाचा उद्या ‘युवा महोत्सव’
By Admin | Updated: October 5, 2014 23:06 IST2014-10-05T22:47:43+5:302014-10-05T23:06:48+5:30
विविध नऊ स्पर्धा : सुमारे नऊशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग

विद्यापीठाचा उद्या ‘युवा महोत्सव’
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३४ वा युवा महोत्सव यावर्षी द्विस्तरीय पद्धतीने होणार आहे. त्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत. त्यातील कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव मंगळवारी (दि. ७) दिवसभर राजाराम महाविद्यालयात होणार आहे. त्यात नाट्य, गायन, नृत्य अशा नऊ स्पर्धांमध्ये सुमारे नऊशे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविणार आहेत.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील प्रश्नमंजूषा स्पर्धा आज, रविवारी दुपारी एक वाजता ज्या-त्या जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याचा युवा महोत्सव मंगळवारी राजाराम महाविद्यालयात होईल. सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
गायन, नृत्य, एकांकिका, नाट्य अशा नऊ प्रकारांत महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याचे संयोजक व राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत
हेळवी यांनी सांगितले.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात ९ आॅक्टोबरला कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या कॉलेज, तर सातारा जिल्ह्यात ११ आॅक्टोबरला दहीवडी कॉलेजमध्ये युवा महोत्सव होणार आहे. जत (सांगली) येथील राजे रामराव कॉलेजमध्ये दि. १५ व १६ आॅक्टोबरला मध्यवर्ती युवा महोत्सव घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)