तुकडीस वाढीव ४० टक्के प्रवेश देण्यास विद्यापीठाने मान्यता द्यावी
By Admin | Updated: July 5, 2016 00:09 IST2016-07-04T23:28:10+5:302016-07-05T00:09:53+5:30
अतिरिक्त विद्यार्थांचा प्रश्न : प्राचार्य, संस्थाचालकांची मागणी

तुकडीस वाढीव ४० टक्के प्रवेश देण्यास विद्यापीठाने मान्यता द्यावी
कोल्हापूर : पदवी प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी एका तुकडीला ४० टक्के क्षमता वाढवून द्या, अशी मागणी प्राचार्य, संस्थाचालकांनी शिवाजी विद्यापीठाकडे सोमवारी केली. याबाबत त्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्याशी चर्चा केली.
पदवीच्या प्रथम वर्षातील अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाबाबत विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. शिंदे व बीसीयुडी संचालक डॉ. मोरे व शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन व संस्थाचालकांची बैठक झाली. त्यात प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील, संस्थाचालक भैया माने, प्रा. किसन कुराडे,
आदींनी अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची स्थिती सांगितली. तसेच अतिरिक्त विद्यार्थ्यांकडून प्रवेशाबाबत वारंवार विचारणा होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पर्याय म्हणून सध्या महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय एका तुकडीला ४० टक्के वाढीव प्रवेश देण्यास मान्यता देण्याची मागणी केली, तसेच ज्या महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकडीची मागणी केली आहे, त्याला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य, संस्थाचालकांनी केली.
त्यावर अतिरिक्त तुकडीची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला शासनाकडून लवकरच मान्यता मिळेल. एका तुकडीला वाढीव ४० टक्के प्रवेश क्षमता वाढवून हवी आहे. त्यांनी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
या प्रस्तावांचा विचार करून त्याला मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. बैठकीस प्राचार्य बी. एन. पवार, सी. आर. गोडसे, सतीश घाळी, पी. जी. पाटील, एस. बी. पाटील, प्रवीण चौगुले, आदींसह विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)