विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ
By Admin | Updated: March 15, 2016 00:26 IST2016-03-14T23:52:53+5:302016-03-15T00:26:58+5:30
‘मनविसे’चा आरोप : फेरतपासणीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ
कोल्हापूर : सन २०१४ मध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे कामकाज भोंगळपणे झाले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी येथे केला. फेरतपासणीत ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने केली शिवाय याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले.
अभियांत्रिकी विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सन २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केले. फेरतपासणीनंतर गुणांमध्ये तफावत दिसून आली. माहिती अधिकारातून विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार फेरतपासणीमध्ये अभियांत्रिकीच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्क्यांनी अधिक आहे. त्यात विशेष म्हणजे गणितमधील प्रत्येक वर्षासाठी असलेल्या सर्वांमध्ये ९५ टक्के बदल झाला आहे. अन्य विषयांतील गुणांत देखील बदल झाले आहेत. यावरून उत्तरपत्रिका तपासणीचे काम भोंगळपणे झाल्याचे दिसून येते. परीक्षा नियंत्रकांकडे देखील आम्ही उत्तरपत्रिका तपासणीचा मुद्दा मांडला. पण, त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. उत्तरपत्रिकांची योग्य पद्धतीने तपासणी न करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात ‘मनसे’चे नगरसेवक राजू दिंडोर्ले, ‘मनविसे’चे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, प्रसाद साळोखे, अमोल कुंभार, उत्तम वंदुरे, अजित लोहार, रोहित शिंदे, संतोष खटावकर, किरण कोरे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)