विद्यापीठाच्या जुन्याच निधीची नव्याने घोषणा!

By Admin | Updated: July 2, 2015 01:14 IST2015-07-02T01:14:25+5:302015-07-02T01:14:39+5:30

‘सुवर्णमहोत्सवी’ निधी : टप्प्या-टप्प्याने मिळणार; कर्मचारी, पदांबाबत सकारात्मक निर्णय

University announces new funding! | विद्यापीठाच्या जुन्याच निधीची नव्याने घोषणा!

विद्यापीठाच्या जुन्याच निधीची नव्याने घोषणा!

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेला ४० कोटी ३३ लाख रुपयांचा सुवर्णमहोत्सवी निधी शिवाजी विद्यापीठाला टप्प्या-टप्प्याने मिळणार आहेत. एकूण निधीपैकी दरवर्षी पाच ते दहा कोटी रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबत मंत्रालयात काल, मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत चर्चा झाली. निधी देण्याबाबत सरकारची भूमिका अनुकूल असली तरी विद्यापीठाच्या जुन्या निधीची नव्याने घोषणा करण्याचा प्रकार झाला आहे.
सुवर्णमहोत्सव निधीतील ४० कोटी ३३ लाख रुपये विद्याशाखांचे बांधकाम आणि यंत्रसामग्रीसाठी होते. त्यात स्कूल आॅफ नॅनो सायन्स, यूथ डेव्हलपमेंट सेंटर, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रूरल डेव्हलपमेंट, राजर्षी शाहू संशोधन केंद्र, कनव्हेंशन सेंटर, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाचा समावेश आहे. शिवाय नव्या विभागांतील विविध ११३ पदांसाठी ४ कोटी ६७ लाख रुपये होते. त्यापैकी गेल्या चार वर्षांत अवघे ३ कोटी ७९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने हाती घेतलेले विभाग, प्रकल्पांची गती मंदावली असून, त्यासाठी विद्यापीठ फंडावर बोजा पडला. निधी मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वारंवार फेऱ्या मारल्या. मात्र, निधीतील एक रुपयाही मिळाला नाही. नव्या भाजप-शिवसेना सरकारकडून निधी मिळविण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा प्रयत्न सुरू केले. या निधीसह विद्यापीठातील विविध घटकांच्या प्रश्नांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तावडे व पालकमंत्री पाटील यांनी मंत्रालयात मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यांनी प्रलंबित निधी पुरवणी मागणीत समाविष्ट करून अंदाजपत्रकीय तरतूद करून तातडीने रक्कम अदा करण्याचे प्रयत्न केले जातील, असे उच्चशिक्षण विभाग व विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यातून विद्यापीठाला संबंधित निधी टप्प्या-टप्याने मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)



अतिरिक्त विद्यार्थ्यांबाबतचे प्रस्ताव सादर करा
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अतिरिक्त ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी विद्यापीठाला सादर करावे. विद्यापीठाने उच्चशिक्षण सहसंचालकांना आणि सहसंचालकांनी राज्य शासनाला हे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री तावडे यांनी दिले आहेत.


विद्यापीठाच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली. बैठकीतील सूचनांनुसार प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. सुवर्णमहोत्सवी निधीबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

Web Title: University announces new funding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.