महागावातील १०० वर्षांच्या तुळसाबार्इंचे अनोखे कार्य
By Admin | Updated: July 7, 2015 21:11 IST2015-07-07T21:11:40+5:302015-07-07T21:11:40+5:30
गरोदर काळात महिलांनी सकस आहार व व्यायाम केल्यास प्रसूती नैसर्गिक होते, असा तुळसाबार्इंनी बाळंतिणींना सल्ला दिला आहे.

महागावातील १०० वर्षांच्या तुळसाबार्इंचे अनोखे कार्य
परशुराम आसवले -महागाव--आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने असंख्य बाळ-बाळंतिणींची सेवा करणाऱ्या तुळसाबाई सत्याप्पा झोकांडे यांनी महागाव पंचक्रोशीत केलेले अनोखे कार्य कौतुकास्पद आहे.महागाव (ता. गडहिंग्लज) येथील १०० वर्षांच्या तुळसाबाई झोकांडे या महागावच्या रहिवासी असून, त्या निरक्षर आहेत. गेल्या ४० वर्र्षांपासून बाळंतपणाच्या पहिल्या दिवसापासून बारसे होईपर्यंत बाळ व बाळंतिणींची नि:स्वार्थी मनाने त्या सेवा करतात. आतापर्यंत त्यांनी सर्व जाती-धर्मातील शेकडो स्त्रियांचे सुखरूप व कमी खर्चात बाळंतपण केले आहे. त्या मोबदल्यात त्यांना मिळणारा चोळीचा खण, श्रीफळ आणि थोडे तांदूळ इतक्या मोबदल्यावर त्या खूश असतात.प्रसूती काळ म्हणजे महिलांच्या आयुष्यातील पुनर्जन्मच असतो. ‘सिझरिंग’ हा शब्द वैद्यकीय असला, तरी तो आता प्रचलित झाला आहे. ५० वर्षांपूर्वी महागाव परिसरात वैद्यकीय सेवेचा गंधही नव्हता. ‘सुईन’ हीच बाळंतपणाचे कार्य मोठ्या निष्ठेने पार पाडत असे. कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करणाऱ्या व वयाची शंभरी गाठलेल्या तुळसाबाई आजही धडधाकट आहेत. त्यांच्यावर श्रद्धा असणारी अनेक कुटुंबे आजही महागावसह परिसरात आहेत. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून अनोखे कार्य करणाऱ्या तुळसाबार्इंचा महागावचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. जी. खोत, जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे.शासकीय पातळीवर तुळसाबाई यांच्या कार्याची दखल घ्यावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
वयाच्या १०० व्या वर्षीही तुळसाबाई सत्याप्पा झोकांडे सुईणीचे काम श्रद्धेने पार पाडत आहेत.
महागावसह परिसरातील १०-१५ खेड्यांत सुईन म्हणून तुळसाबार्इंचे आदराने नाव घेतात. त्यांनी ऊन, वारा, पाऊस, वेळी-अवेळी जाऊन अडलेल्या महिलांची सोडवणूक केली आहे.
गरोदर काळात महिलांनी सकस आहार व व्यायाम केल्यास प्रसूती नैसर्गिक होते, असा तुळसाबार्इंनी बाळंतिणींना सल्ला दिला आहे.