गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांची कलामांना अनोखी श्रद्धांजली

By Admin | Updated: July 30, 2015 00:00 IST2015-07-30T00:00:11+5:302015-07-30T00:00:11+5:30

वाद्यांविना रंगली मिरवणूक : सुदृढ बैलजोडी स्पर्धेत २९ बैलजोड्यांचा सहभाग

Unique tributes to the villagers of Gadhinglaj | गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांची कलामांना अनोखी श्रद्धांजली

गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांची कलामांना अनोखी श्रद्धांजली

गडहिंग्लज : ना पी डबाक ..ना ढोल ताशा..ना लेझीम..ना झांज..ना बँडबाजा या कोणत्याही वाद्यांशिवाय गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढली अन् माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.निमित्त होतं..महाराष्ट्रीयन बेंदूर सण व येथील शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे आयोजित सुदृढ बैलजोडी स्पर्धेचं. गेल्या सलग १५ वर्षांपासून ही स्पर्धा होत आहे. गडहिंग्लजसह सीमाभागातील हजारो शौकीन ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून येतात. मात्र, कलामजींच्या अचानक जाण्याने शेतकरी व कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंत:करणानेच ही स्पर्धा घेतली.
दिवसभर वाजत-गाजत काढल्या जाणाऱ्या मिरवणुका आणि एकापेक्षा एक जातिवंत बैलजोड्यांचे प्रदर्शन असे वातावरण असते. मात्र, ‘मिसाईल मॅन’ कलामजींच्या जाण्याने शोकाकूल झालेल्या शेतकरी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजची स्पर्धा वाजंत्रीविना घेण्याचे ठरवले, अन् पार पाडली.या स्पर्धेत एकूण २९ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. आदल्या दिवशीच स्पर्धेची तयारी पूर्ण झालेली होती. डॉ. कलाम यांच्या निधनामुळे स्पर्धा होणार की नाही याबाबत साशंकता होती. सकाळी काळभैरी मंदिरात आयोजित बैठकीत कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पारंपरिक बेंदूर व स्पर्धा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष राजेश बोरगावे, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष वसंत यमगेकर,‘भाजप’ तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर, उपस्थित होते.
स्पर्धेत बैलजोडी गटात गणपती डोमणे यांच्या बैलजोडीने, दाती गटात महाबळेश्वर कापसे यांच्या बैलजोडीने, तर बिनदाती गटात रावसाहेब मोकाशी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. सायंकाळी बक्षीस वितरणही साधेपणानेच झाले.
सविस्तर निकाल अनुक्रमे असा : बैलजोडी - गणपती गंगाराम डोमणे (गडहिंग्लज), रामगोंडा रायगोंडा पाटील (नूल), नारायण आत्माराम येरूडकर (बसर्गे), बाळासाहेब गोपाळ शिंदे (हेब्बाळ काा नूल), भीमराव लक्ष्मण बिरंजे (भडगाव) दाती गट - महाबळेश्वर निजाप्पा कापसे (नंदनवाड), राहुल भीमराव नेवडे (गडहिंग्लज), शिवाजी दत्तू मांडेकर (गडहिंग्लज), सुजित आप्पासाहेब यादव (नूल), बाबू भीमा खमलेहट्टी (गडहिंग्लज) बिनदाती गट - रावसाहेब तानाजी मोकाशी (खणदाळ), बाबूराव मल्लाप्पा मोर्डी (गडहिंग्लज), नारायण बाळाप्पा गवळी (बसर्गे), डॉ. सचिन शंकर कोडोली (भडगाव), राजू गौराप्पा लक्यान्नावर (खणदाळ). (प्रतिनिधी)

Web Title: Unique tributes to the villagers of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.