नवचैतन्यमध्ये झाला अनोखा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:30+5:302021-01-13T05:03:30+5:30
घन:शाम कुंभार यड्राव: दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेली एखादी बातमी जीवनात शिक्षणापासून विवाहापर्यंत जाऊन स्थिरता मिळवून देते. याचा प्रत्यय येथील ...

नवचैतन्यमध्ये झाला अनोखा विवाह सोहळा
घन:शाम कुंभार
यड्राव: दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेली एखादी बातमी जीवनात शिक्षणापासून विवाहापर्यंत जाऊन स्थिरता मिळवून देते. याचा प्रत्यय येथील नवचैतन्य अनाथालयच्या परिसराने अनुभवला. ‘लोकमत’च्या एक बातमीने निराधार इंद्रजीत पाटील अभियंता बनला व गरीब घरातील आईचे छत्र हरवलेल्या ‘भारती’ या युवतीबरोबर विवाहबद्ध झाला. या अनोख्या विवाह सोहळ्यात अनाथालयाचे संस्थापक वरपिता बनले. तर शासकीय अधिकारी व-हाडी झाले.
नवचैतन्य अनाथालयमधील इंद्रजीत पाटील याने दहावीला चांगले गुण प्राप्त केल्यावर अभियंता बनण्याची इच्छा ‘लोकमत’मधील बातमीतून प्रकट झाली. त्याची दखल घेऊन शरद इन्स्टिट्युटने त्याच्या डिप्लोमा डिग्री शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतल्याने त्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तो पुणे येथील कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे.
सर्वसामान्य घरातील व आईचे छत्र हरवलेल्या ‘भारती’ युवतीशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय त्याने घेतला. हा मंगल सोहळा नवचैतन्य बालगृहाच्या परिसरात संपन्न झाला. बालगृहाचे संस्थापक भीमराव आव्हाड वरपिता बनले. तर संतोष घोटगे यांनी विवाहाचे आयोजन केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे अतीश शिंदे व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली हिंगमिरे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रियदर्शनी चोरगे, शमशुद्दीन शेख, अॅड. दिलशाद मुजावर यांच्यासह मान्यवर या विवाह सोहळ्यात व-हाडी बनले.
चौकट - ‘लोकमत’मुळे जीवन प्रवास सुखकर
दैनिक ‘लोकमत’मुळे मला शरद इन्स्टिट्युटने डिप्लोमा, डिग्रीचे शिक्षण मोफत दिले. यामुळे माझे जीवन स्थिरस्थावर बनले. नवचैतन्य बालगृहाचे भीमराव आव्हाड व संतोष घोटगे यांनी माझ्यावर कृपाछत्र राखल्याने माझा जीवन प्रवास सुखकर बनला, अशी कृतज्ञता इंद्रजीत पाटील याने व्यक्त केली.
फोटो - ११०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी - नवचैतन्य बालगृहामध्ये इंद्रजीत व भारती यांच्या विवाहाप्रसंगी शासकीय अधिकारी यांनी व-हाडी बनून शुभेच्छा दिल्या. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)