सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम

By Admin | Updated: July 18, 2014 23:44 IST2014-07-18T23:42:37+5:302014-07-18T23:44:23+5:30

परसात सुगरणींचे आगमन : सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम

The unique initiative of Bhagyamitra Madhav Joshi of Sangawade | सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम

सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम


परसात सुगरणींचे आगमन : सांगवडे येथील पक्षीमित्र माधव जोशी यांचा अनोखा उपक्रम
कोल्हापूर : एक घास चिऊचा... एक घास काऊचा असं म्हणत आई आपल्या तान्हुल्याला एक ... एक... घास भरवायची, त्यावेळी त्या तान्हुल्याची उत्सुकता वाढायची. चिऊताईच्या हालचाली न्याहाळीत आई देईल तो घास घशातून खाली उतरत रहायचा. आईचा हेतू साध्य व्हायचा आणि तान्हुल्याचं पोटही भरायचं! परंतु, आता ही चिऊताई दुर्मीळ होऊ लागलीय आणि तिला दाखवीत घास भरविणारी आईसुद्धा! कारण चिऊताईची जागा मिकी माऊसने घेतलीय, तर आईची जागा मम्मीनं! परंतु, या बदलत्या परिस्थितीतही एका अवलियानं चिऊताईचं हे अस्तित्व जपण्याचा आणि त्यांच्यापासून मिळणारा आनंद परिसरातील लहानथोरांना मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्यापरीने सुरू ठेवलाय.
करवीर तालुक्यातील सांगवडे येथील माधव रा. जोशी हे या अवलियाचं नाव आहे. पक्षीमित्र माधव जोशी यांनी अनेक वर्षांपासून हा छंद जोपासला आहे. काळाच्या ओघात चिमण्यांचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. मात्र, जोशींच्या परसात दरवर्षी जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत सुगरणी चिमण्या येथे येत असतात. यंदाही या सुगरणी चिमण्यांचे आगमन झाले आहे. चिमण्यांचं आगमन झाल्यापासून जोशी कुटुंबीय त्यांना खाऊ पिऊ घालतात. त्यांच्यासाठी परसात एक स्वतंत्र कक्ष उभारला असून, पाण्याचा छोटा कुंडही तयार करून घेतला आहे. अलीकडे दुर्मीळ होत असलेल्या या चिमण्यांवर जोशी कुटुंबीय जणू काही आपले नातलग असल्याप्रमाणे मनापासून प्रेम करतात.
लहान मुलांना चित्रात चिमण्या दाखविणारे गावातील वृद्ध आपल्या नातवांना घेऊन जोशी यांच्या घरी चिमण्या दाखविण्यास येतात. या चिमण्यांच्या दर्शनाने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलते. या चिमण्या पाहताना गावातील मुलं गुंग होऊन जातात. आपल्या जीवनात शिलाई मशीनच्या व्यापातून वेळ काढून जोशी हे चिमण्यांसाठी रोज दोन ते अडीच किलो तांदूळ घालतात. त्यामुळे या चिमण्यांनाही जोशींचा लळा लागलेला आहे. परसात दाणे टिपणाऱ्या या चिमण्यांची हालचाल लक्षवेधी असते. या पाहुण्यांना न्याहाळण्यासाठी लहानांपासून मोठ्यांचीही गर्दी होते.
जून महिन्यात आलेल्या या चिमण्या सप्टेंबरमध्ये निघून जातात, ते पुढच्या वर्षी न चुकता येण्याचे अभिवचन देऊनच! माणुसकीला विसरलेल्या जगात चिमण्यांवर निर्व्याज प्रेम करणारे जोशी आणि त्यांच्या परसात येणाऱ्या चिमण्या गावातील लोकांचा कुतूहलाचा विषय बनून गेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The unique initiative of Bhagyamitra Madhav Joshi of Sangawade