पन्हाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश
By Admin | Updated: June 4, 2015 00:03 IST2015-06-03T21:35:33+5:302015-06-04T00:03:13+5:30
मोफत देणार : १९४ शाळांसाठी समिती स्थापन; एकीची भावना वाढीस लागण्यास मदत

पन्हाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश
देवाळे : पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्याचा ठेका दोनच व्यापाऱ्यांना दिल्यामुळे शासनाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेश व बिगर लाभार्थी (सर्वसाधारण विद्यार्थी) विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश व्यापाऱ्यांकडून मोफत पुरवला जाणार आहे.
पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती सुनीता पाटील, उपसभापती रवींद्र जाधव, पंचायत समितीचे सर्व सदस्य, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, विकास पाटील यांच्या प्रयत्नातून या तालुक्यातील १९४ शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गणवेश एकसारखाच करण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी सुमारे २५ सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सभापती, उपसभापती, गटविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षक संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी, विस्तार अधिकारी, कासोरे मॅडम, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी, सरपंच प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या समितीने गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक बैठका घेऊन मुला-मुलींच्या गणवेशाचा रंग, कापडाचा दर्जा, बूट, टाय, गणवेशावर लोगो, शाळांना एकसारखाच रंग, शाळेचा नामफलक, संरक्षक भिंंतीचा रंग, कापड व शिलाई ठेकेदार यासंबंधी ऊहापोह करून ही योजना अत्यंत प्रभावीपणे व पारदर्शीपणे राबवण्यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे.
या तालुक्यात १९४ शाळांमध्ये एकूण १७,९२३ विद्यार्थी आहेत. यापैकी १०,५३७ विद्यार्थी लाभार्थी म्हणजे शासनाचे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी रु. ४०० अनुदान मिळणार, तर उर्वरित ७,३८६ विद्यार्थी हे सर्वसाधारण गटातील असल्याने गणवेशापासून वंचितराहणाऱ्या या विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांकडून सर्व तालुक्याचे काम मिळाल्याबद्दल एक गणवेश मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व १७,९२३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक टाय, खिशावर ‘शिक्षण विभाग, पंचायत समिती पन्हाळा’ या नावाचा लोगो तयार करून मिळणार आहे. दिलेल्या नमुन्याचे दर्जेदार कापड, उत्तम शिलाई यासंबंधी कापड पुरवठादार ओंकार एंटरप्रायझेस गांधीनगर, कोल्हापूर व शिलाई पुरवठादार ‘आर्या गारमेंट, मेन रोड, घुणकी’ यांचा व पन्हाळा पंचायत समितीची गणवेश समिती यांचेबरोबर करार करण्यात आला आहे.
याशिवाय बूट-सॉक्स, शालेय पिशवी प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन घ्यावी लागणार आहे. याचा आर्थिक बोजा पालकांवर पडू नये यासाठी ज्या त्या गावातील सामाजिक बांधीलकी असणारे आणि दानशूर व्यक्ती यांच्याकडून देणगी स्वरूपात घेतली जाणार आहे. अशा या नावीन्यपूर्ण योजनेत योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना
याबाबत पन्हाळ्याच्या सभापती सुनीता पाटील व उपसभापती रवींद्र जाधव म्हणाले, तालुक्याचा एकाच प्रकारचा व एकाच रंगाचा गणवेश केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना निर्माण होईल. वंचित सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना एक-एक गणवेश मोफत मिळेल. टाय, बूट, सॉक्स, एकसारखी शालेय पिशवी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल व खासगी शाळांच्या तुलनेत सर्वसामान्यांच्या जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल.