भरधाव एसटीच्या धडकेत बालकाचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2015 01:18 IST2015-03-06T01:16:14+5:302015-03-06T01:18:26+5:30
आजी-आजोबा किरकोळ जखमी : रजपूतवाडी फाटा येथे अपघात

भरधाव एसटीच्या धडकेत बालकाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर रजपूतवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास भरधाव एस.टी. बसने मोपेडला पाठीमागून धडक दिल्याने आजी-आजोबांसोबत पन्हाळ्याला नातेवाइकांकडे निघालेल्या पाच वर्षांच्या बालकाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सुफियान सादिक जहाँगीर (रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याचे आजी-आजोबा यास्मीन सलीम काझी (वय ५०, रा. कात्यायनी पार्क, कळंबा) व सलीम बापूलाल काझी (५५) हे किरकोळ जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी सांगितले, यास्मीन काझी व त्यांचे पती सलीम काझी यांच्या मुलीचा मुलगा सुफियान हा एक वर्षाचा असल्यापासून त्यांच्याजवळ राहतो. त्याचे आई-वडील नोकरीनिमित्त पुण्याला स्थायिक आहेत. पन्हाळ्यावर नातेवाइकांना भेटण्यासाठी मोपेडवरून तिघेजण दुपारी निघाले होते. रजपूतवाडी फाटा येथे पाठीमागून भरधाव आलेल्या एस.टी. बसने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये तिघेही मोपेडवरून रस्त्यावर पडले. सुफियानच्या डोक्याला मार लागून तो जाग्यावरच बेशुद्ध पडला होता, तर त्याचे आजी-आजोबा किरकोळ जखमी झाले. एस.टी.चालक अपघातस्थळी न थांबता एस.टी. बससह पसार झाला. रस्त्यावरील इतर नागरिकांनी तिघांना खासगी रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयामध्ये आणले. याठिकाणी उपचारापूर्वीच सुफियानचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच आजी-आजोबांना मानसिक धक्का बसला. बालकाचा मृतदेह पाहून सीपीआरमधील डॉक्टरांसह पोलीस व नातेवाइकांना अश्रू अनावर झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी एस.टी. बसचा नंबर ६५०६ असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी एस.टी.च्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित नंबरच्या एस.टी. बसबाबत चौकशी केली असता ती कोल्हापूर-कोतोली मार्गावरील असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्या एस.टी. चालक व वाहकाचा मोबाईल नंबर पोलिसांनी मागवून घेतला.