शनिवारपासून लसीकरण पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:40+5:302021-07-02T04:17:40+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत पुण्याहून कोल्हापूरला येईल. त्याचे केंद्रनिहाय वितरण झाल्यानंतर शनिवारपासून लसीकरण सुरळीत होईल, ...

शनिवारपासून लसीकरण पूर्ववत
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लस आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत पुण्याहून कोल्हापूरला येईल. त्याचे केंद्रनिहाय वितरण झाल्यानंतर शनिवारपासून लसीकरण सुरळीत होईल, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त आरोग्य अधिकारी फारूक देसाई यांनी दिली.
आरोग्य प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्रात लस दिली जात आहे. आतापर्यंत शहर आणि जिल्ह्यात साडेदहा लाख जणांना लस देण्यात आली आहे. अजूनही २० लाख जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य प्रशासनाने निश्चित केले आहे. आरोग्य प्रशासन दर आठवड्याला शहर, जिल्ह्यासाठी २ लाख ८० हजार लसीच्या डोसची मागणी करते. पण प्रत्यक्षात ५० हजारच डोस मिळत आहेत. दरम्यान, लस टंचाईमुळे लस वितरणात विस्कळीतपणा आला आहे. लसच नसल्याने चार दिवसांपासून लसीकरण बंद आहे. त्यामुळे अनेकजण लसीकरण केंद्रावर येऊन परत जात आहेत. केंद्रावर लस उपलब्ध नाही, उपलब्ध कधी होईल, सांगता येत नाही. त्यामुळे लसीकरण बंद आहे, अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. पुण्याहून लस शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापुरात पोहोच होईल. त्यानंतर केंद्रनिहाय वितरण झाल्यानंतर शनिवारपासून लसीचे वितरण होईल, असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.