गॅससह पेट्रोल सेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST2021-07-27T04:24:55+5:302021-07-27T04:24:55+5:30
कोल्हापूर : पुराचे पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत अंकली व कोल्हापूर सांगली फाट्याजवळ उभे असलेले २० हून अधिक पेट्रोल, डिझेलचे टँकर ...

गॅससह पेट्रोल सेवा पूर्ववत
कोल्हापूर : पुराचे पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत अंकली व कोल्हापूर सांगली फाट्याजवळ उभे असलेले २० हून अधिक पेट्रोल, डिझेलचे टँकर व दहा ट्रक गॅस सिलिंडरचा साठा सोमवारी शहरात दाखल झाला. त्यामुळे पेट्रोल आणि गॅस सिलिंडरच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला.
गेल्या चार दिवसांपासून कृष्णेसह पंचगंगा नदीला महापूर आला होता. त्याचा फटका वाहतूक सेवेला बसला. त्यामुळे मिरजेतील विविध कंपन्यांच्या तेल डेपोतून बाहेर पडलेले टँकर अंकली पुलाजवळ व शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगेचे पुराचे पाणी आल्यामुळे थांबून होते. हे टँकर पुराचे पाणी कमी झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ते सुरक्षितरित्या शिरोलीहून कोल्हापूरकडे पोहोचविण्यात आले. त्यामुळे तीन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा जाणवत होता. काही पंपांवर साठा संपला होता. त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेत भर पडली होती. ज्या पेट्रोल पंपांवर साठा उपलब्ध होता. त्या ठिकाणी अभूतपूर्व गर्दी निर्माण झाली होती. अनेक पंपावर वाहनधारकांमध्ये वादाचेही प्रसंग झाले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तीन दिवस पेट्रोल वितरण झाले. सोमवारी २० हून अधिक टँकर शहरात पोहोचल्यानंतर वाहनधारकांची पंपावरील गर्दीही कमी झाली.
सिलिंडरचा साठा मुबलक
कोल्हापूर शहराला दिवसाला १० हजार गॅस सिलिंडरची गरज लागते. मात्र, प्रत्येक गॅसधारकाकडे दोन सिलिंडर असल्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला नाही. तरीसुद्धा पुढे समस्या उद्भवू नये, म्हणून कोल्हापुरात दहा हून अधिक ट्रॅक गॅस सिलिंडरचा साठा सोमवारी शहरात दाखल झाला. विशेष म्हणजे वाई, हजारवाडी, भिलवडी आदी ठिकाणाहून रिफिलिंग केलेले सिलिंडर शहराला पुरविले जातात.
सीएनजीचा साठाही मुबलक
शहरात डिझेल, पेट्रोलसह सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सीएनजी पंपही नव्याने होऊ लागले आहे. जिल्ह्यात असे सहा पंप आहेत. त्याला रत्नागिरीहून सीएनजी पुरवठा होता. हाही पुरवठा पुरामुळे प्रभावित झाला होता. तोही पूर्ववत झाला.
पेट्रोल पंप - ३००
गॅस वितरक -३००
गॅसधारक संख्या - २ लाख २५ हजारांहून अधिक
व्यावसायिक सिलिंडर संख्या - ५०००