भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची कोल्हापूरला गरज : चंद्रकांतदादा
By Admin | Updated: May 10, 2017 17:49 IST2017-05-10T17:49:37+5:302017-05-10T17:49:37+5:30
आराखडा तयार करा, कोट्यवधींचा निधी देऊ

भुयारी मार्ग, उड्डाणपुलांची कोल्हापूरला गरज : चंद्रकांतदादा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. १0 : खासबाग येथे भुयारी मार्ग तसेच वाहतुकीची कोंडी होणाऱ्या मार्गांवर उड्डाणपूल केल्यास शहराची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता करता येणे शक्य असल्याने त्याप्रमाणे उपाययोजना करा, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा, लागेल तितका निधी शासनाकडून देऊ, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी (दि. ९) पोलीस मुख्यालयात झालेल्या वाहतूक समस्येसंदर्भातील बैठकीत केल्या.
शहरातील वाहतुकीच्या आगामी नियोजनाबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी या उपाययोजना सुचविल्या होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी बैठक झाली. शहरात वाहतुकीची कोंडी होणारी एकूण १९ ठिकाणे असून, त्यांपैकी छोट्या स्वरूपातील उपाययोजना तातडीने करून कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. खासबाग येथे वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असल्याने तेथे पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग आवश्यक असल्याची सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मांडली.
शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविणे आवश्यक आहे. तसेच दाभोळकर कॉर्नर ते व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक ते मिरजकर तिकटी, गंगावेश चौक ते रंकाळा टॉवर या तीन मार्गांवर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. या तिन्हीही मार्गांवर व्यापारपेठा, शाळा, हॉटेल्स आहेत. तसेच या मार्गांवरूनच शहराबाहेर जाणारी वाहतूक होत असल्याचेही सरनोबत यांनी सादरीकरणात सांगितले.
नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगून वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी भुयारी मार्ग, उड्डाणपूल आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करा. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी देण्याची शासनाची तयारी असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.