पीएन-महाडिक यांच्या ३० वर्र्षांच्या सत्तेला सुरुंग; सतेज पाटील पुन्हा किंगमेकर : ‘गोकुळ’च्या लढाईत नेत्यांच्या एकजुटीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST2021-05-05T04:41:29+5:302021-05-05T04:41:29+5:30
कोल्हापूर : ‘संचालक म्हणून ठरावधारक पाठीशी व ठरावधारकांमुळे पुन्हा सत्ता,’ अशी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीतील ...

पीएन-महाडिक यांच्या ३० वर्र्षांच्या सत्तेला सुरुंग; सतेज पाटील पुन्हा किंगमेकर : ‘गोकुळ’च्या लढाईत नेत्यांच्या एकजुटीचा विजय
कोल्हापूर : ‘संचालक म्हणून ठरावधारक पाठीशी व ठरावधारकांमुळे पुन्हा सत्ता,’ अशी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीतील गेल्या ३० वर्षांतील परंपरा या निवडणुकीत त्याच ठरावधारकांनी मोडीत काढली व त्यामुळेच सत्तारूढ आघाडीचे नेते पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके यांच्या सत्तेला सुरुंग लागला. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजूट केल्यानेच हा विजय साकारला. या निकालाचा जिल्ह्याच्या व किमान पाच विधानसभा मतदार संघांतील राजकारणावर थेट परिणाम होणार आहे. गेली तीन दशके ‘गोकुळ’च्या सत्तेत महादेवराव महाडिक ही एक शक्ती होती. त्यांच्या शब्दावरच तेथील सत्ता चालत असे, ठरत असे व बदलत असे. सत्तेतील एवढी भक्कम मांड मोडून काढण्यात या निवडणुकीत सतेज पाटील यांना यश आले. एका पराभवाने कोण राजकारणातून संपत नाही; परंतु सततच्या पराभवामुळे लढण्याची जिद्द खचते, हे नाकारता येत नाही.
या विजयात निर्णायक ठरलेल्या गोष्टी अशा :
१. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या निवडणुकीत गोकुळ बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून मोट बांधून सत्तारूढांना आपण आव्हान देऊ शकतो हे सिद्ध केले होते. गेल्याच निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला असता तर सत्तांतर झाले असते. या निवडणुकीत मुश्रीफ यांच्यासह आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील यांची मोट बांधण्यात ते यशस्वी झाले. सगळ्या नेत्यांनी मदत केली असली तरी पालकमंत्री पाटील यांनी सत्तांतर घडविणारच या जिद्दीने केलेला प्रयत्न, त्यासाठी राबविलेली यंत्रणा व पायांना पाने बांधून गेले महिनाभर पालथा घातलेला जिल्हा यांचेही निकालात मोठे श्रेय आहे.
२. विरोधी आघाडीने सत्तेत आल्यावर लिटरला २ रुपये दर जास्त देण्याची घोषणा केली. संघातील कारभार पारदर्शी झाला तर दोनच का, त्याहून जास्त दर देणे शक्य आहे. ‘गोकुळ’चा कारभार ‘अमूल’च्या धर्तीवर करू व आम्ही चांगला कारभार नाही केला तर पुढच्या वेळेला तुमच्या दारात मते मागायला येणार नाही, असा शब्द सतेज पाटील-मुश्रीफ यांनी दिला होता. त्यावरही मतदारांनी विश्वास ठेवला.
३. सगळे नेते एका बाजूला झाल्याने सत्तारूढ आघाडीला सहानुभूती मिळेल व त्यामुळे बहुमत सत्तारूढ आघाडीचेच होईल, अशीही हवा मतदानाच्या आधी दोन दिवसांत जोरदार तयार झाली होती; परंतु विरोधी आघाडीच्या नेत्यांनी तसे होऊ दिले नाही. गेल्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसोबत गेलेले ठरावधारक आत गेल्यावर बदलले होते. यावेळेला काही प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले; परंतु त्याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. नेत्यांनी आपापले ठरावधारक आघाडीशी कसे प्रामाणिक राहतील अशी जोडणी लावल्यानेच हा विजय साकारला.
४. सुरुवातीच्या टप्प्यात मुश्रीफ यांनी सत्तारुढ आघाडीसोबत बिनविरोधच्या चर्चा चालू ठेवल्या. त्यातही सतेज-मुश्रीफ एकत्र येणार नाहीत, असा संभ्रम तयार केला. विरोधी आघाडीत के. पी. पाटील असल्याने त्यांचे विरोधक असलेले आमदार प्रकाश आबिटकर त्यांच्यासोबत जाणार नाहीत, हा होरा चुकीचा ठरवला. हातकणंगलेमध्ये डॉ. सुजित मिणचेकर व आमदार राजूबाबा आवळे या परस्परविरोधी गटांनाही सोबत घेतले. ही चाणक्यनीती यशस्वी ठरली.
५. संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे व चुयेकर घराणे सत्तारूढ आघाडीपासून बाजूला करण्यात यश आल्याने विजयाची पायाभरणी झाली. या तिघांकडेही एकगठ्ठा मतदार होते. ते मतदार गट बदलला तरी त्यांनी आपल्या पाठीशी कायम राखले. करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत सर्वाधिक मतदार आहेत. तिथेच विरोधी आघाडीला बळ मिळाल्याने वातावरण बदलले.
६. विरोधी आघाडीतून मंत्री-आमदार-खासदारांचीच मुले रिंगणात उतरल्याचे नकारात्मक चित्र तयार झाले होते. त्याचा फटका जरूर वीरेंद्र मंडलिक यांना बसला; परंतु इतरांबद्दलची नाराजी मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता व्यक्तिगत पातळीवर घेतल्याचा फायदा झाला. वीरेंद्र मंडलिक यांचा एकदा जिल्हा परिषदेत पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी देण्यापेक्षा कार्यकर्त्याला संधी दिली असती तर मंडलिक यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठीही ते योग्य ठरले असते; परंतु तसे घडले नाही.
७. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेवटच्या टप्प्यात सत्तारूढ आघाडीस पाठिंबा दिला; परंतु शेट्टी यांच्या प्रतिमेचाही फारसा उपयोग झाला नाही. माजी आमदार सत्यजित पाटील हे सुरुवातीला विरोधी आघाडीसोबत आले; परंतु विनय कोरे हे विरोधी आघाडीत आल्याने नाराज होऊन ते बाहेर पडले. त्यांच्याकडेही मतांचा गठ्ठा होता; परंतु कोरे यांनी त्यांना शाहूवाडीत रोखले. शिवाय पन्हाळ्यात चंद्रदीप नरके व कोरे यांनी चांगली मते घेतल्याचाही फायदा झाला. चंद्रदीप नरके यांचा विधानसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने नरके गटाने इरेला पेटून काम केले.
८. गोकुळ ही महाडिक यांची जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाची आर्थिक व राजकीय सत्ता होती. त्या जोरावर त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय डाव यशस्वी केले. पी. एन. पाटील यांनाही आमदार करण्यात या सत्तेचे मोठे पाठबळ राहिले. जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या सर्वच सत्ता महाडिक यांच्याकडून काढून घेण्यात मंत्री सतेज पाटील यशस्वी झाले आहेत. या सत्तांतराचा परिणाम आगामी महापालिका, विधानपरिषद व राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतही होणार आहेत.
९. या निवडणुकीच्या तोंडावरच सत्तारूढ आघाडीने त्यातही मुख्यत: महाडिक समर्थकांनी सतेज पाटील यांच्या मालमत्तेच्या घरफाळ्याचे प्रकरण चर्चेत आणले. हा विषय कसा तापेल असेही प्रयत्न केले; परंतु विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही त्याचा काहीच प्रभाव पडला नाही.