उंदरवाडीच्या मंगल कांबळे सादवताहेत पाळक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:17+5:302021-07-03T04:16:17+5:30
रमेश वारके बोरवडे : ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाळक पाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आजपर्यंत पुरुषांकडे ...

उंदरवाडीच्या मंगल कांबळे सादवताहेत पाळक !
रमेश वारके
बोरवडे : ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाळक पाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आजपर्यंत पुरुषांकडे असलेला हा मक्ता मोडून काढत उंदरवाडी (ता. कागल) येथील मंगल कांबळे यांनी पाळक सादवण्याचे काम स्वीकारले आहे. यातून मिळणाऱ्या अल्प मोबदल्यात त्यांनी आठ जणांच्या कुटुंबांची जबाबदारी पेलली आहे.
दरवर्षी मृग नक्षत्रापासून दसरा सणापर्यंत पाच महिने बेलजाई देवीचे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी पाळक पाळले जाते. या दिवसात पाळक सादवण्याचे काम गावातील कै. परसू कांबळे यांच्या घरात परंपरेपासून चालत आले आहे.
मंगल या मोठ्या हिमतीने बाहेर पडल्या आणि त्यांनी पहिल्या वेळीच खड्या आवाजात गावातील मुख्य चौक आणि गल्ली-बोळात जाऊन पाळक सादवला. सुरुवातीला गावकऱ्यांना मंगल यांचे आश्चर्य वाटले; परंतु नंतर त्यांनी मंगल यांचे कौतुकही केले. पाळक सादवण्याचे काम ते करतात. या मोबदल्यात गावपाटलांकडून त्यांना वर्षाला दोन पोती भात दिले जातात. एवढ्याच उत्पन्नावर आठ लोकांचे कुटुंब चालविण्याची कसरत कांबळे परिवार करीत आहे.
चौकट
पतीच्या आजारपणामुळे त्यांना गावपाळक सादवण्याचे काम जमणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर मी धाडसाने बाहेर पडले. सुरुवातीला थोडी भीती वाटली, परंतु गावकऱ्यांनी माझ्या धाडसाचे कौतुक करून मला पाठिंबा दिला. या कामाच्या मोबदल्यातून काय मिळते यापेक्षा गावाची आणि देवीची सेवा केल्याचे मोठे समाधान आहे.
-मंगल कांबळे, उंदरवाडी
फोटो ओळी :
उंदरवाडी : येथे गावपाळक सादवताना मंगल कांबळे.