अशोकअण्णांच्या ‘चाली’ने राष्ट्रवादीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:38 IST2016-03-21T21:07:34+5:302016-03-22T00:38:19+5:30

आजरा साखर कारखाना निवडणूक : भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रवींद्र आपटे गट एकत्र येणार

Uncertainty in the NCP with 'Chalai' of Ashokan | अशोकअण्णांच्या ‘चाली’ने राष्ट्रवादीत अस्वस्थता

अशोकअण्णांच्या ‘चाली’ने राष्ट्रवादीत अस्वस्थता

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा  येथे झालेल्या मेळाव्यात अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी आजरा साखर कारखाना निवडणुकीत आपणाला आघाडीचे सर्व अधिकार दिल्याचे कार्यकर्त्यांकडून वधवून घेतले. मात्र, त्याचबरोबर विजयासाठी आपण एखाद्या मोठ्या गटाशी आघाडी करण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे जाहीर करून जी गुगली टाकली आहे त्यामुळे राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता दिसत आहे.
अशोकअण्णांच्या व्यासपीठावर जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे व कारखान्याचे विद्यमान
९ संचालक उपस्थित होते. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे सर्व कार्यकर्तेही होतेच. जोडीला शिवसेनेचे संभाजी पाटील, भाजपचे बाबूराव कुंभार, स्वाभिमानीचे तानाजी देसाई ही मंडळी असल्यामुळे सध्यातरी अशोक अण्णा भाजप - शिवसेना - स्वाभिमानी संघटना-रवींद्र आपटे गट अशी राष्ट्रवादीविरोधी दिशा स्पष्ट होत आहे.
जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, अंजना रेडेकर हे राष्ट्रवादी व अशोकअण्णा वगळता प्रबळ गट समजले जातात. पैकी जयवंतराव शिंपी राष्ट्रवादीसोबत दिसत असले तरी जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव व जनता बँक निवडणुकीत जयवंतरावांना झालेले मतदान पाहता जयवंतरावांचे कार्यकर्तेच राष्ट्रवादीची संगत करू नका अशी भूमिका घेऊ लागले आहेत. नकळतपणे अशोकअण्णा परवडले पण राष्ट्रवादीतील काही मंडळी नकोत, असाच संदेश कार्यकर्ते देऊ लागले आहेत. सद्य:स्थितीत जयवंतरावांसारखा एखादा गट अशोकअण्णांच्या हाताला लागला तर अनेक धक्कादायक गोष्टी घडू शकतात. अशोकअण्णांच्या कायकर्त्यांचीही जयवंतरावांसोबत जाण्यात हरकत दिसत नाही.
राहता राहिला प्रश्न विष्णूपंत केसरकर व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा. विष्णुपंतांची नेहमीप्रमाणे अद्याप तरी सावध भूमिका आहे. राष्ट्रवादीतील काही मंडळींचा त्यांना विरोध असला तरी बेरजेचे राजकारण करावयाचे ठरल्यास विष्णूपंतांना राष्ट्रवादीमध्येच सामावून घेतले जाईल. अंजनाताई या आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या असल्याने त्यादेखील राष्ट्रवादीसोबत राहण्याची शक्यता आहे.
अशोकअण्णांनी सर्वांना दरवाजे खुले असल्याचे सांगितले असले तरी जयवंतरावांशी हातमिळवणी करून आमदार मुश्रीफांची गडहिंग्लज कारखान्यातील खेळी अशोकअण्णांकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येण्याची शक्यता बळावल्याने राष्ट्रवादीमध्ये मात्र अस्वस्थता वाढू लागली आहे. अशोकअण्णा, जयवंतराव, स्वाभिमानी, सेना, भाजप अशी आघाडी झाल्यास राष्ट्रवादी- काँगे्रसलाही काही नेटकी व्यूहरचना करावी लागणार हे निश्चित.

Web Title: Uncertainty in the NCP with 'Chalai' of Ashokan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.