सांगलीत ‘सुटा’च्या सभेत अभूतपूर्व गोेंधळ
By Admin | Updated: May 1, 2017 00:14 IST2017-05-01T00:14:23+5:302017-05-01T00:14:23+5:30
सांगलीत ‘सुटा’च्या सभेत अभूतपूर्व गोेंधळ

सांगलीत ‘सुटा’च्या सभेत अभूतपूर्व गोेंधळ
सांगली : सुटा (शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ)च्या सांगलीतील वार्षिक सभेत रविवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. सदस्य नसलेल्या लोकांच्या उपस्थितीवरून गदारोळ झाल्यानंतर सभा बेमुदत काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय सुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील यांनी घेतला. त्यानंतरही सभागृहात दंगा सुरूच राहिला. दोन्ही गटाच्या प्राध्यापकांनी समांतर सभा घेऊन एकमेकांबद्दल संताप व्यक्त केला.
सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी सुटाने वार्षिक सभा आयोजित केली होती. अध्यक्ष आर. एच. पाटील यांनी सभेला सुरुवात करण्यापूर्वी संघटनेचे सदस्य नसलेल्या लोकांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना दिली. त्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. पदाधिकाऱ्यांची ही हुकूमशाही असल्याचे मत काही विरोधी सदस्यांनी मांडले.
काही ज्येष्ठ सदस्य केवळ काही गोष्टींबाबतची माहिती घेण्यास आले असताना, त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. सदस्यांमध्ये दोन गट पडले. प्रचंड वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी दोनवेळा सभा तहकूब केली. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिला.
सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी सांगली-कोल्हापूर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही गटाचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावले. ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीनंतर मारामारीची संभाव्य घटना टळली. सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार टीका विरोधी सदस्यांनी केली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, सदस्य नसणाऱ्या लोकांनी सभागृहात उपस्थित राहणे हे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे घटना मोडून कोणीही कोणते कृत्य करू नये. त्यावर विरोधी गटातील एका सदस्याने या गोष्टीला आक्षेप घेतला. निवडणुकीच्यावेळी मुदत संपल्यानंतर काही सदस्यांचे अर्ज मागे घेताना घटना मोडलेली चालते, मग संघटनेच्या सभेला केवळ उपस्थित राहिल्याने काय होणार आहे?, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे वाद विकोपाला गेला. गदारोळातच सभा तहकूब करण्यात आली.
त्यानंतर दोन्ही गटांनी समांतर सभा घेतल्या. विरोधी गटाच्या सदस्यांनी प्रा. रघुनाथ ढमकले यांच्या अध्यक्षतेखाली, तर सत्ताधारी गटाने आर. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. (प्रतिनिधी)
का पडले प्राध्यापकांमध्ये गट?
सत्ताधारी गटाने कोल्हापुरात अंबाई डिफेन्स येथे एका सोसायटीच्या जागेसाठी १ कोटी रुपये अॅडव्हान्स दिले आहेत. ही जागा निवासी वापराची असल्याने संघटनेची ही गुंतवणूक वादात अडकली आहे. अद्याप मालमत्तेला संघटनेचे नाव लागलेले नाही. ज्यांच्या स्वाक्षरीने १ कोटी रुपये या जागेपोटी भरण्यात आले, त्या पदाधिकाऱ्याकडून या रकमेची वसुली करावी, अशी विरोधी गटाची मागणी आहे. ऐनवेळच्या विषयात हा मुद्दा उपस्थित होणार होता. त्यापूर्वीच सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे समांतर सभा घेऊन विरोधी गटाने जागेत अडकलेली रक्कम वसूल करण्याबाबतचा ठराव मंजूर केला. संघटनेने निलंबित केलेल्या बी. आर. वडाम या लिपिकाच्या पुनर्नियुक्तीचा विषयही समांतर सभेत चर्चेस आला. या लिपिकाबद्दल पदाधिकारी हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेत असल्याची टीका विरोधी गटाने केली.