भाजप, कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता
By Admin | Updated: May 13, 2015 21:25 IST2015-05-13T21:25:43+5:302015-05-13T21:25:43+5:30
इचलकरंजी नगरपालिका : सुरेश हाळवणकर, प्रकाश आवाडे यांना शह देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना

भाजप, कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता
इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडामुळे विरोधी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले. आणि नगरपालिकेत निर्माण झालेल्या विचित्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजप व कॉँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीचा उदय झाला आहे. या आघाडीबाबत दोन्ही पक्षांकडील गोटात अस्वस्थता आहे.साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून शहर विकास आघाडीने प्रभावी काम केले. ५७ नगरसेवक असलेल्या नगरपालिकेत दोन्ही कॉँग्रेसचे ४० नगरसेवक असले तरी ‘शविआ’च्या १७ नगरसेवकांनी सत्तारूढ आघाडीच्या कामकाजावर वचक ठेवला होता.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन बंड केले. त्यांना ‘शविआ’ ने व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. त्यावेळेपासून ‘शविआ’ चे प्रमुख सागर चाळके यांनी पालिकेची सूत्रे हाती घेतली. कॉँग्रेसमध्ये माजी नगरसेवक सतीश डाळ्या यांना मानणारा एक गट आहे. त्यामुळे चाळके यांनी डाळ्या गटाशीही संधान बांधले.
नगरपालिकेमध्ये कॉँग्रेसमधील काही नाराज नगरसेवकांचा गट
आहे. असा कॉँग्रेसमधील नगरसेवकांचा गट, शहर विकास आघाडीतील भाजप वगळता अन्य नगरसेवकांचा गट, राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील कारंडे व जांभळे हे दोन्ही गट आणि काही मातब्बर अपक्ष यांची आवळ्या-भोपळ्यांची मोट चाळके बांधत आहेत. त्यातून निर्माण झालेली तिसरी आघाडी आमदार सुरेश हाळवणकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना शह देण्यास तयार झाली आहे. (प्रतिनिधी)
आवाडेंना कंटाळले, तर हाळवणकरांकडून अपेक्षाभंग
नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला निश्चितपणे चांगले यश मिळेल, असे मत आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी व्यक्त केले. कारण इचलकरंजीची जनता आवाडेंना कंटाळली आहे. आणि आमदार हाळवणकर यांनी, तर अपेक्षाभंग केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गळाला कोणते मासे, याचीच चर्चा
तिसऱ्या आघाडीबाबत माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, तिसरी आघाडी होत असेल, तर आनंद आहे. याबाबत भाजपकडून अद्याप तरी काही प्रतिक्रिया नोंदविण्यात आलेली नाही. तरीही कॉँग्रेस व भाजपमध्ये राजकीय पातळीवर अस्वस्थता आहे. चाळके यांच्या गळाला कोणते मासे लागलेत, याचीच येथील राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा आहे.