अविश्वास ठरावाचे राजकारण रंगणार!

By Admin | Updated: November 20, 2015 00:16 IST2015-11-19T21:10:50+5:302015-11-20T00:16:55+5:30

इचलकरंजी पालिका : ‘शविआ’ -कॉँग्रेस येणार आमने-सामने

Unbelief resolution will play politics! | अविश्वास ठरावाचे राजकारण रंगणार!

अविश्वास ठरावाचे राजकारण रंगणार!

इचलकरंजी : आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीबरोबरच कॉँग्रेसकडून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर येणाऱ्या अविश्वास ठरावाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर कॉँग्रेस पक्षाकडून शहरातील जीवनावश्यक विषयांवर बोलविण्यात येणाऱ्या विशेष सभांविषयीसुद्धा कमालीची उत्सुकता आहे. यानिमित्ताने नगराध्यक्षांचे समर्थन करणारी शहर विकास आघाडी व कॉँग्रेस यांच्यात राजकीय कुरघोड्यांचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी नगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या बलाबलात कॉँग्रेसचे बहुमत आहे. पालिकेतील ५७ नगरसेवकांपैकी कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये पालिकेमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती व आरोग्य सभापती ही पदे कॉँग्रेसकडे, तर बांधकाम सभापती व शिक्षण सभापती ही पदे राष्ट्रवादीकडे आहेत. कॉँग्रेस पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी पाठिंबा दिला.
नगराध्यक्षांच्या बंडाला दहा महिने झाले. या कालावधीमध्ये नागरिकांची विकासकामे व्हावीत म्हणून कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटाने नगराध्यक्षा यांना सहकार्य करण्याचे ठरविले. मात्र, शहर विकास आघाडी व नगराध्यक्षा सापत्न वागणूक देतात, अशा आशयाच्या जोरदार तक्रारी कॉँग्रेस नगरसेवक-नगरसेविकांच्या आहेत. म्हणून दीपावलीनंतर नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत कॉँग्रेसकडून निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर शहरास मुबलक व स्वच्छ पाणी देणारी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी नळ योजना, पालिकेच्या आयजीएम दवाखान्याचे हस्तांतरण, भुयारी गटार योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर विशेष सभा बोलवाव्यात. म्हणून नगराध्यक्षांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे कॉँग्रेसने ठरविले होते.
अशा पार्श्वभूमीवर पुढील महिन्यामध्ये पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुक नगरसेवक व नगरसेविकांनी फिल्डींग लावली आहे. तसेच बांधकाम समितीचे सभापतिपद नगरसेविकेला मिळावे, अशीही मागणी नगरसेविकांच्या गटाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता दीपावलीचा सण संपला असून, नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)

कॉँग्रेस आणि अविश्वासाची ‘मॅजिक फिगर’
नगरपालिकेमधील पक्षनिहाय व गटनिहाय नगरसेवकांचे सध्या तरी नगराध्यक्षांच्यावरील अविश्वास ठराव संमत होण्यासाठीचे बहुमत कॉँग्रेस पक्षाकडे नाही. कॉँग्रेस व जांभळे गट या दोघांचे मिळून ३६ नगरसेवक होतात. तर नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावासाठी ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा जादुई आकडा कॉँग्रेसकडून कोणत्या प्रकारे गाठला जाणार, याचीही उत्सुकता आहे.

Web Title: Unbelief resolution will play politics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.