उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र
By Admin | Updated: March 17, 2016 23:42 IST2016-03-17T23:09:03+5:302016-03-17T23:42:46+5:30
आरोग्य विभागाकडून मंजुरी : चिंचवाडलाही होणार आरोग्य उपकेंद्र

उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र
जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्याला महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून मंजुरी मिळाली असून, जयसिंगपूर येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय होणार आहे़ तर कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जयसिंगपूर, उदगाव व कवठेगुलंद या गावांना तत्पर आरोग्य सेवा मिळणार आहे़
गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूरला ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर झाला आहे़ मात्र, तो जागेअभावी रखडला होता़ तसेच जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून नागरिकांतून होत होती़ मात्र, हा प्रश्न शासन दरबारी पडून होता़ यासाठी माजी बांधकाम व आरोग्य सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न सुटला आहे़
जयसिंगपूर येथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे़ येथे ग्रामीण रुग्णालयासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षांपासून पडून असून, त्याला गती मिळणार आहे़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे सुरू होणार आहे़ येथे ‘अ’ व ‘ब’ अशी दोन आरोग्य उपकेंद्रे असून, त्यातील एक काळम्मावाडी वसाहतीकडे स्थलांतरित होणार आहे़ तर दुसरे आरोग्य केंद्र चिंचवाड येथे स्थलांतरित करणार असल्याचे सावकार मादनाईक यांनी सांगितले़ तर उदगाव येथे होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत व निवासस्थानाच्या बांधकामाकरिता जिल्हा नियोजन व विकास मंडळ यांच्याकडून तरतूद होणार आहे़ नवीन इमारत मिळेपर्यंत सध्या स्थलांतरित झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र बसस्थानकाजवळ असलेल्या ‘अ’ व ‘ब’ आरोग्य केंद्रात सुरू होणार आहे़
नदीपलीकडील सात गावांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने कवठेगुलंद (ता़ शिरोळ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे;पण जागेअभावी ते रखडले होते़ मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध झाल्याने हाही प्रश्न निकालात निघाला आहे़ (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा पाठपुरावा
‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा करून ‘जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा संपेना’, ‘उदगावला प्राथमिक आरोग्य केंद्र कधी’, ‘चिंचवाड गाव आरोग्य केंद्रापासून वंचित’ अशा विविध मथळ्यांखाली वृत्त मालिका प्रसिद्ध केली होती़ आता याची प्रतीक्षा संपली आहे़ त्यामुळे नागरिकांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे़