शिवसेनाप्रमुखांच्या चित्रांना उद्धव ठाकरे यांची दाद अजजूनही स्मरते
By Admin | Updated: December 9, 2014 00:34 IST2014-12-08T21:10:01+5:302014-12-09T00:34:51+5:30
सतीश कदम :--संवाद

शिवसेनाप्रमुखांच्या चित्रांना उद्धव ठाकरे यांची दाद अजजूनही स्मरते
‘‘गांधारेश्वर या चिपळूणजवळील निसर्गरम्य परिसराची जन्मजात मिळालेली देणगी माझ्या चित्रांना प्रेरणा देणारी ठरली. अनेक प्रसंगात चित्र प्रदर्शने झाली. मात्र, चिपळूण शहरातील एक नंबर शाळेत शिवसेनाप्रमुखांच्या एकापेक्षा एक व्यक्तिमत्त्वाची रेखाटलेली चित्र व त्यांना मिळालेली रसिकांची दाद जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण ठरला...’’
सतीश कदम या तरुणाने साडेतीनशेहून अधिक चित्र काढली आहेत. चिपळूणमध्ये हौशी चित्रकारांच्या संघटनेमार्फत अनेक ठिकाणी अनेक कार्यक़्रम झाले. प्रदर्शने भरवली गेली. प्रतिकूल परिस्थितीतही चित्रांमुळे आपल्याला जगण्याचे सामर्थ्य लाभते. हा अनेकांचा सल्ला आज प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो आहे. निसर्गचित्र, सामाजिक विषय, राजकीय व्यंग, मराठवाड्यातील दुष्काळाबाबत निर्माण झालेले विदारक चित्र, स्त्रीभ्रूण हत्या, भ्रष्टाचार व जगाला वंद्य ठरलेली युगपुरुषांची चित्र रेखाटली. त्यातून मान्यवरांची शाबासकीही मिळाली.
शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे चिपळूणमध्ये आले असता त्यांना आपण शिवसेनाप्रमुखांची चित्र काढल्याचे समजले होते. प्रत्यक्षात मीही त्यांच्या भेटीसाठी आतूर होतो. ती भेट झाली. मला परमानंद झाला. त्यातून स्फूर्ती घेत साडेतीनशे चित्रांची निर्मिती केव्हा झाली हे कळले नाही.
चित्रकार म्हणून समोर येताना भान जपले पाहिजे, याची जाणीव होत गेली. रवींद्र धुरी, मुकुंद काणे यांनी हात धरुन जिथे चुकलो तिथे शिकायला लावले व त्यातून नवनिर्मितीचा आनंद झाला. चिपळूणमध्ये अनेक चित्रकार आहेत. प्रत्येकाची वेगळी अशी धाटणी आहे. मी अजून शिकतो आहे. तरीही अनेक चित्रांना मिळालेली दाद हा माझ्यादृष्टीने ठेवा आहे. चित्र काढत असताना मला भावलेला प्रसंग निश्चितच लक्षणीय आहे. शिवसेनाप्रमुखांचे निधन झाले व जगातून त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शिवतीर्थावर झालेली गर्दी हा क्षण साठवण्यासारखा. तो जगत होतो, कागदावर तो उतरवण्याचा प्रयत्न केला व शिवसेनाप्रमुखांच्या एकामागोमाग एक अशा अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या. चित्रातून त्या साकारल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
निसर्ग, महापूर, किनारा, नारळी-पोफळीच्या बागा, कोकणातील घरे, मंदिरे, वाडे या साऱ्याचे एकत्रिकरण चित्रांमधून पाहायला मिळते. कदम यांनी या चित्रांद्वारे अधिक प्रबोधनाचा प्रयत्न केला आहे. नवीन विषय निवडताना सामाजिक भान जपणाऱ्या विषयांचे आकलन व्हायला लागते. अभ्यास करावा लागतो. पहाटे गांधारेश्वर किनारी बसून धुकं पाहण्यात व अनुभवण्यात आलेली मजा व त्याचा कुंचल्याद्वारे झालेला आविष्कार हा माझ्यासाठी नेहमीच उत्साह देणारा ठरला. अशाच विषयांमध्ये प्रदर्शनांची भर पडत गेली. साडेतीनशे चित्रांमध्ये वेगवेगळे भाग आहेत. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रांमधील आलेली मंदी, देशामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी केलेले परदेश दौरे व त्यांना मिळालेला अनेक राष्ट्रांचा पाठिंबा, प्रचंड गर्दी व देशातील क्रमांक २च्या नेतृत्त्वाचे कुंचल्याद्वारे आविष्करण अनुभवायचे आहे. जहांगीर आर्टमध्ये प्रदर्शन, हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मात्र, केवळ इच्छा असून चालत नाही, त्याला पाठबळ असावे लागते. अजून खूप चित्र काढायची आहेत. त्यामध्ये विश्लेषणात्मक चित्रकृती साकारायच्या आहेत. आज ना उद्या जहांगीरचे स्वप्न पुरे होईलही. मात्र, चिपळूणकरांच्या प्रेमामुळेच मी चित्रकार म्हणून समोर येत आहे, असंही हा तरूण आवर्जून सांगतो.
- धनंजय काळे
मानसीचा चित्रकार तो, रमतो चित्रांमध्ये...
प्रतिकूल परिस्थितीत ब्रश हाती धरला आणि व्यसन म्हणून चित्रांचा संसार रंगवला.
हौशी चित्रकारांनी पहिल्या प्रदर्शनात हजेरी लावली आणि कलेचे कौतुक केले.
महापुरानंतर उद्ध्वस्त चिपळूणने झालो होतो व्यथित. शिवाजी चौकातील वाताहात अनुभवली.
महापुराचे दृश्य कागदावर रंगवताना थरारले होते हात.
चिपळूणमध्ये आर्ट गॅलरी व्हावी, ही मागणी केव्हा पूर्ण होणार.