आजरा कारखाना सुरू करण्याबाबत उद्धव ठाकरे आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:39+5:302021-01-08T05:20:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत आजरा साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा यासाठी ...

Uddhav Thackeray insists on starting Ajra factory | आजरा कारखाना सुरू करण्याबाबत उद्धव ठाकरे आग्रही

आजरा कारखाना सुरू करण्याबाबत उद्धव ठाकरे आग्रही

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत आजरा साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू राहावा यासाठी योग्य मार्ग काढून मदत करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी खास आजरा साखर कारखान्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आजरा साखर कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे आणि संचालिका अंजना रेडेकर यांनी कारखाना सुरू व्हावा, यासाठी अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत. त्यांची ही धडपड पाहून आमदार प्रकाश आबिटकर यांनीही यात पुढाकार घेत या बैठकीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे मुश्रीफ यांच्यासह सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय मंडलिक, खासदार विनायक राऊत, साखर आयुक्त शेखर गायकवाड यावेळी उपस्थित होते. एवढ्या सर्वांना बैठकीसाठी पाचारण करीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आजरा कारखान्याबाबत आपण किती गंभीर आहे, हे स्पष्टपणे दाखवून दिले.

यावेळी सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेत चेअरमन शिंत्रे यांनी कारखान्याची सद्य:स्थिती सांगितली. जिल्हा बँकेने यामध्ये सुवर्णमध्य काढल्याशिवाय हा कारखाना सुरू होणार नाही. हा कारखाना गेले दोन हंगाम बंद राहिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जिल्हा बँकेवर यामुळे होणारा परिणाम, सुरू झालेला हंगाम यांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. नाबार्ड, रिझर्व्ह बँकेचे नियम या सगळ्यांबाबत यावेळी साधकबाधक चर्चा झाली.

चौकट

यंदा साखर पाडून दाखवतो

आजरा कारखान्याचा विषय संपवताना मी तुम्हांला यंदा साखर पाडून दाखवतो, असा शब्द मुश्रीफ यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याची खातरजमा करण्यासाठी रात्री मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. पुढच्या वर्षी आजरा कारखाना सुरू करण्याची जाहीर भूमिका मुश्रीफ यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता नेमका कारखाना कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र आमदार आबिटकर आणि चेअरमन शिंत्रे यांनी अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत हे निश्चित.

Web Title: Uddhav Thackeray insists on starting Ajra factory