कोल्हापूर : एसटी भाडेवाढविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मंगळवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोर रस्ता अडवत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.विजय देवणे म्हणाले की, एसटी विभागात साधारण एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, एसटी महामंडळाचा गलथान व नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, विविध मोफत प्रवास योजना व सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास वर्षानुवर्षे महाग हाेत आहे. आता तर सध्याच्या सरकारने १५ टक्के भाडेवाढ करून ग्राहकांचा खिसा कापण्याचे काम केले आहे. मोफत योजना देतानाच सर्व तोटा भरून काढण्याची जबाबदारी ही विद्यमान सरकारची असते. प्रत्येकवेळी हा बोजा ग्राहकांवर पडणार नाही, याची दक्षता घेणे सरकारचे काम असते. सध्याचे विद्यमान सरकार एसटी प्रशासन चालवते की संबंधित विभागाचे मंत्री, हा एक चेष्टेचा विषय आहे. ही भाडेवाढ मागे घ्या म्हणत शिवसैनिकांनी रस्त्यावरच चक्काजाम केले. या आंदोलनात राजू जाधव, संजय पटकारे, विनोद खोत, भरत आमते, संतोष रेडेकर, राजू यादव, विराज पाटील, स्मिता सावंत, संतोष रेडेकर, शशिकांत बिडकर, अतुल परब, सुहास डोंगरे, शौनक भिडे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इचलकरंजीत शहापूर आगारासमोर शंखध्वनी आंदोलनइचलकरंजी : महाराष्ट्र एसटी महामंडळाने अचानक एसटीची भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेच्या वतीने शहापूर आगारासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख महेश बोहरा, शिवाजी पाटील, धनाजी मोरे, दत्तात्रय साळुंखे, मनोज भाट, गणेश जंगटे, संजय पाटील, संतोष गौड, गणेश शर्मा, अजय घाडगे, दादा पारखे आदी सहभागी झाले होते.अन्यायकारक भाडेवाढ तत्काळ मागे घ्या!हातकणंगले : गोरगरीब व सामान्य जनतेचा प्रवासाचा आधार असलेल्या एस.टी. बसची अन्यायकारक भाववाढ मागे घ्यावी, प्रवाशांना योग्य आणि चांगल्या सेवा-सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी हातकणंगले बस स्थानक चौकात चक्का जाम अंदोलन करून आगार प्रमुखांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.