रंकाळ्यावर ‘हिट ॲन्ड रन’चा प्रकार : दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST2021-02-21T04:47:59+5:302021-02-21T04:47:59+5:30

कोल्हापूर : रंकाळा तलावासमोरील शिवाजी मराठा हायस्कूलजवळील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने खाद्यपदार्थ स्टाॅलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना उडविले. यात ...

Types of 'Hit and Run' on Rankala: Blowing up two-wheelers | रंकाळ्यावर ‘हिट ॲन्ड रन’चा प्रकार : दुचाकींना उडविले

रंकाळ्यावर ‘हिट ॲन्ड रन’चा प्रकार : दुचाकींना उडविले

कोल्हापूर : रंकाळा तलावासमोरील शिवाजी मराठा हायस्कूलजवळील रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीने खाद्यपदार्थ स्टाॅलसमोर उभ्या असलेल्या दुचाकींना उडविले. यात एका खाद्यपदार्थाच्या गाडीसह आठ दुचाकींचे नुकसान झाले असून, दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता घडली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास रंकाळा टाॅवरकडून भरधाव वेगाने चारचाकी आली. रंकाळा तलावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ती रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली उतरली. तेथे लावलेल्या सहा ते आठ दुचाकी तिने उडविल्या. शिवाजी मराठा हायस्कूलच्या दारात एक खाद्यपदार्थाची गाडी उभी होती. या गाडीलाही या चारचाकीने धडक दिली. यात अपघातात दोघे जखमी झााले. यावेळी जमा झालेल्या संतप्त नागरिकांनी चालकाला चारचाकीतून बाहेर काढत चोप दिला व चारचाकी फोडली. घटनेची माहिती नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना कळविल्यानंतर तत्काळ पोलीस दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाला शांत करीत हटविले. तत्काळ अग्निशमन दलाची गाडीही तेथे दाखल झाली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगविले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

चौकट

दोन गटांत वादावादी

अपघातग्रस्त चारचाकीचा चालक हा याच परिसरातील असल्यामुळे त्याचे मित्रही तत्काळ या परिसरात दाखल झाले. ज्यांचे नुकसान झाले त्यांचीही मित्रमंडळी दाखल झाली. दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यामुळे बाचाबाची झाली. हा वाद स्थानिकांनी मिटवला. या प्रकारामुळे काही काळ रंकाळा परिसरात वातावरण तंग होते.

फोटो : २१०२२०२१-कोल-ॲक्सिडेन्ट

ओळी : कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरात झालेल्या अपघातातील संतप्त जमावाने फोडलेली चारचाकी .

Web Title: Types of 'Hit and Run' on Rankala: Blowing up two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.