‘एव्हीएच’ कामगारांची दोन वाहने पेटविली
By Admin | Updated: June 3, 2015 01:11 IST2015-06-03T01:08:03+5:302015-06-03T01:11:17+5:30
१५ कामगार जखमी : अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला

‘एव्हीएच’ कामगारांची दोन वाहने पेटविली
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील सुपे फाट्यानजीक अज्ञात हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली व गाड्यांवर दगडफेक करून दोन वाहने पेटविली. हल्लेखोरांनी तोंडावर मास्क करून ट्रॅकसूट घातली होती. वाहन पेटवून हल्लेखोर उसातून पसार झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजता घडली.सात मार्च रोजी आंदोलकांनी एव्हीएच कंपनीची जाळपोळ केली होती. जनभावनेचा आदर करून राज्य शासनाने कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली. पण, गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाळपोळीत नुकसान झालेल्या मशिनरींची दुरुस्ती करण्यात येत होती. यासाठी बेळगावहून पोलीस बंदोबस्तात कामगारांना आणणे व सोडण्याचा दिनक्रम सुरू होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजता काम आटोपल्यानंतर कामगारांना घेऊन तीन गाड्या बेळगावला जात होत्या. यासोबत पोलीस गाडीही होती. सुपे आरटीओ नाक्यानजीक या कामगारांच्या गाड्यांना सोडून राहिलेल्या कामगारांना आणण्यासाठी पोलीस गाडी परत गेली. याचा फायदा घेऊन दोन वाहनांवर दगडफेक केली. तिसऱ्या वाहनधारकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडी परतून लावली. या वाहनातील कामगारांना हल्लेखोरांनी बाहेर काढून मारहाण केली. काही कामगार हल्लेखोरांचे मोबाईलवर फोटो घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी कामगारांचे मोबाईल काढून घेऊन पुन्हा मारहाण केली. त्यामुळे भयभीत कामगार वाट मिळेल त्या दिशेने पळत सुटले. १० मिनिटांतच पोलीस दाखल झाले. परंतु हल्लेखोरांनी पलायन केले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहने पेटत असल्याने या मार्गावरील २ तास वाहतूक ठप्प झाली. जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजली नाहीत. हल्लेखोरांनी फक्त दहा मिनिटांतच दोन वाहने पेटवल्याने या हल्ला पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पोलीस निरीक्षक अंगद जाधवर, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी करीत आहेत. (प्रतिनिधी)
आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न : बाभूळकर
कोल्हापूर येथे मागील आठवड्यातच मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत एव्हीएच संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असून, त्याचा अहवाल येईपर्यंत कंपनीला दिलेली स्थगिती उठविणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.
त्यामुळे समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही आंदोलन करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंगळवारी झालेली घटना आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले.
कोल्हापुरातील बैठकीत कृती समितीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरीची उच्चस्तरीय समिती नेमून एव्हीएच कंपनीची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन करणार नाही, असे कृती समितीमध्ये ठरले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असतानाच ही घटना आंदोलनाला गालबोट लावणारी आहे. हा पूर्वनियोजित कट का असू नये, असे सांगून या घटनेचा निषेध करत असल्याचे कृती समितीचे अॅड. संतोष मळवीकर यांनी सांगितले.
घटनाक्रम
२५ जानेवारी २०१३ - कंपनीची जाळपोळ २७ मे २०१३ - जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला ७ मार्च २०१५ - कंपनीची पुन्हा जाळपोळ
९ मार्च २०१५ - सुपेनजीक एका वाहनाची जाळपोळ २ जून २०१५ - सुपेनजीक दोन वाहनांची जाळपोळ व कामगारांना मारहाण