दोन टनांचा रेडा अन् छान-छान बोकडगाडी !
By Admin | Updated: November 27, 2015 00:40 IST2015-11-26T21:01:35+5:302015-11-27T00:40:24+5:30
शेतीपूरक आधुनिक तंत्रज्ञान : शेती अवजारे, गृहोपयोगी वस्तू, पशूंचे प्रदर्शन; हजारो शेतकरी दाखल

दोन टनांचा रेडा अन् छान-छान बोकडगाडी !
कराड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन झाले़ प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी हजारो शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली़ प्रदर्शनात दाखल झालेली नावीन्यपूर्ण फळे, भाज्या व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची त्यांनी कुतूलहलाने पाहणी केली़ प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे दोन टनांचा रेडा अन् छान-छान बोकडगाडी याबरोबर दिवसाला ४५ लिटर दूध देणाऱ्या म्हैसानमुर्रा जातीची म्हशीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
कृषी प्रदर्शन म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यासमोर चित्र उभ राहत ते म्हणजे, शेतीतील अवजारे, फळे, पिके तसेच शेतकऱ्यांनी आणलेली जनावरे. या प्रदर्शनात जास्त करू न शेतकरी वर्गच भेट देत असतो. मात्र, यंदाचे कृषी प्रदर्शन हे सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनात शेतीतील नवनवीन प्रयोगाबरोबर शासनाच्या शेतीविषयक योजनांविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती या प्रदर्शनातून दिली जाते.
शेती व त्यास पूरक वस्तूंची रेल-चेल असलेल्या येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनास दिवसाला मोठ्या संख्येने शेतकरी भेट देत आहेत. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, विविध कृषी उत्पादने, कृषी योजनांची माहिती, नावीन्यपूर्ण शेती अवजारे, शेतीविषयक माहिती पुस्तके, कृषीशी निगडीत व्यवसायातून आर्थिक समृध्दीचा मंत्र देणाऱ्या पशुपालन व्यवसायाची अद्ययावत माहिती प्रदर्शनात उपलब्ध आहे.
सर्व गोष्टी एकाच छताखाली असलेले हे प्रदर्शन सर्वांसाठी पर्वणीचे ठरत आले. या प्रदर्शनात कृषी, गृहोपयोगी वस्तू, अवजारे यांची वेगवेगळी दालने आहेत. एकाच ठिकाणी शेतीसह पशुपक्षी, गृहोपयोगी वस्तू यासह सर्व काही या ठिकाणी आहे. विविध वस्तूंच्या खरेदीविक्रीतून येथे दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
प्रदर्शनात बुधवारी वेगवेगळ्या प्रकारची फळे, फुले व भाजीपाला समाविष्ट करण्यात आला होता़ तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानायुक्त कृषी अवजारेही प्रदर्शनात दाखल झाली आहेत़ जनावरांच्या प्रदर्शनातील विविध खिलार जातीचे, बैल, गायी, म्हैस, रेडा, जर्सी, होस्टन जातींची गाय यासह पक्षी, पिके, फळे, फुलांनी प्रदर्शन बहरले आहे. विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती माहिती मिळते.
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे गहू, भात, सोयाबीन, गवत, कडबा आणी इतर पिकांचे कापणी आणि बांधणी यंत्राबद्दलही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे़ प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यामध्ये बाहेरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येने समावेश होता. (प्रतिनिधी)
४५ लिटर दूध देणारी म्हैस
कऱ्हाड येथील कृषी प्रदर्शनात गुरुवारी गोळेश्वर येथील विलास जाधव यांनी म्हैसानपुरी जातीची म्हैस आणली होती. दिवसाला ४५ लिटर दूध देणारी आणि ११ दुधाची फॅट असलेली म्हैस ही प्रदर्शनाची खास आकर्षण ठरली आहे. या म्हशीची किंमतही तेवढी जास्त आहे. पाच लाखांपासून ते सात लाख रुपयांपर्यंत किंमत असलेली ही म्हैस पाहण्यासाठी सर्वांकडून गर्दी केली जात होती.
प्रदर्शनात आकर्षण ठरले बोकडगाडी
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे बोकडगाडी. लहान स्वरूपाची तयार करण्यात आलेली बैलगाडी ओढणारे गुजरात क्रॉस जातीचे १८ महिन्यांचे बोकड हे प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर पंढरपुरी व म्हैसाना जातीच्या रेड्याची जोडीही प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.
दोन टनांचा रेडा
कऱ्हाडच्या प्रदर्शनस्थळी येल्लूर, ता. वाळवा येथून संजय जाधव यांनी आणलेला दोन टनांचा रेडा हा प्रदर्शनस्थळी खास आकर्षण ठरत होता. रेड्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
स्पर्धेत तीनशेहून अधिक जनावरे
प्रदर्शनात गुरुवारी गाय, म्हैस, बैल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सातारासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील जनावरांना सहभागी करण्यात आले होते. खिलार, जर्सी, जर्मन जातींच्या गायी. दोन दाती, चार दाती व जुळीक खोंड. पंढरपुरी, मुऱ्हा जातींची म्हशी , ३० लिटर देणारी एचएफ जातीची जर्सी गाय, तसेच खिलार जातीचे साडेपाच फूट उंचीचा असलेला बैल आदी तीनशेहून अधिक जनावरे स्पर्धेच्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळाली.