कोल्हापूरातील दोन हजार शाळा उद्या बंद
By Admin | Updated: January 19, 2017 22:41 IST2017-01-19T22:41:37+5:302017-01-19T22:41:37+5:30
शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, शिक्षण खात्याचे महसुलीकरण करणारे आदेश रद्द करावेत, शिक्षकभरतीवरील बंदी उठवावी

कोल्हापूरातील दोन हजार शाळा उद्या बंद
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.19 - शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, शिक्षण खात्याचे महसुलीकरण करणारे आदेश रद्द करावेत, शिक्षकभरतीवरील बंदी उठवावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज, शुक्रवारी जिल्ह्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही मंगळवारी (दि. १७) दिल्याने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे राज्यव्यापी संपास स्थगिती देण्यात आली. मात्र शिक्षकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे शैक्षणिक व्यासपीठाने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. १८) व गुरुवारी शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले; तर आज, शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील संपकरी सकाळी ११ ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर धरणे व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी आंदोलनात मोठ्या प्रमाणात संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी केले आहे.