इचलकरंजीत तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: September 23, 2014 23:53 IST2014-09-23T23:13:45+5:302014-09-23T23:53:22+5:30
पूर्ववैमनस्यातून वाद : एक गंभीर, तलवार व दगडांचा वापर; परस्परविरोधी तक्रारी दाखल

इचलकरंजीत तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी
इचलकरंजी : येथील कोल्हापूर नाका परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत इरफान दस्तगीर मुल्ला (वय २१, रा. विक्रमनगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. घटनेमुळे रात्री परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
काही दिवसांपूर्वी या दोन्ही तरुणांच्या गटात वाद झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात धरून काल, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांत पुन्हा वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत तलवार, दगड यांचा सर्रास वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांत विक्रम बाळासाहेब तोडकर (२२, रा. स्वामी मळा) याने दिलेल्या तक्रारीत, पिंटू ऊर्फ विकास अरविंद घाटुळे (२२, रा. जवाहरनगर), सनी ऊर्फ रणजित खंडेराव पाटील (२२, रा. हनुमाननगर), सुमित श्रीकांत महिंद (२२, रा. जवाहरनगर), दीपक महादेव कोळेकर (२२, रा. कोरोची), समीर सरदार नदाफ (२२, रा. जवाहरनगर), स्वप्निल सुरेश नंदे (१९, रा. लंगोटे मळा) व एकजण अल्पवयीन अशा सातजणांनी काल रात्री कोल्हापूर नाक्याजवळ तलवार व दगडांनी मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. यामध्ये इरफान मुल्ला याच्या हातावर तलवारीने दोन वार झाल्याने तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)