कवठेमहांकाळला दोघा खंडणीबहाद्दरांना अटक
By Admin | Updated: May 3, 2014 17:01 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T17:01:32+5:30
शासकीय ठेकेदारास धमकावून पाच लाखांची खंडणी मागणार्या निमज (ता. कवठेमहांकाळ) येथील सोपान काबुगडे (वय ४२) व अमोल रुपनर (२८) या दोन खंडणीबहाद्दरांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली.

कवठेमहांकाळला दोघा खंडणीबहाद्दरांना अटक
कवठेमहांकाळ : शासकीय ठेकेदारास धमकावून पाच लाखांची खंडणी मागणार्या निमज (ता. कवठेमहांकाळ) येथील सोपान काबुगडे (वय ४२) व अमोल रुपनर (२८) या दोन खंडणीबहाद्दरांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शासकीय ठेकेदार रुद्रमणी विरुपाक्ष मठ (जत) यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. काबुगडे हा निमजचा माजी सरपंच आहे. या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
विजापूर-गुहागर राज्यमार्गावर निमज भागात पुलाचे काम चालू आहे. या कामाचे शासकीय ठेकेदार रुद्रमणी मठ असून, २८ एप्रिल रोजी पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी काबुगडे व रुपनर आले. त्यांनी मठ यांना शिवीगाळ केली व धमकी दिली. या पुलाचे काम निकृ ष्ट केले असून, याप्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लावतो. काम व्यवस्थित करीत नसल्याने पाच लाख रुपये दे; अन्यथा काम करू देणार नाही, अशी दमदाटी त्यांनी मठ यांना केली.
ते निघून गेल्यानंतर मठ यांनी ही बाब कवठेमहांकाळ पोलिसांना सांगून फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी सोपान काबुगडे व अमोल रुपनर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले. या खंडणीच्या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. काबुगडे व रुपनर यांनी आणखी कोणाला धमकावले असल्यास कवठेमहांकाळ पोलिसांत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)