शिरोळमध्ये नायब तहसीलदारची दोन पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:45+5:302021-09-09T04:28:45+5:30
शिरोळ : येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार अशी दोन पदे रिक्त आहेत. या दोन्ही ...

शिरोळमध्ये नायब तहसीलदारची दोन पदे रिक्त
शिरोळ : येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार अशी दोन पदे रिक्त आहेत. या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कोरोना, महापूर अशा काळात प्रशासनावर मोठा ताण आहे. त्यामुळे रिक्त पदांवर अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे.
शिरोळ तालुका हा तीन शहरे व ५२ गावांचा आहे. गेल्या दीड वर्षापासून निवासी नायब तहसीलदार पद रिक्त आहे. महसूल नायब तहसीलदारपदी काम करणारे पी. जी. पाटील यांच्याकडेच निवासी नायब तहसीलदार पदाचा व महसूल नायब तहसीलदार पदाचा कार्यभार होता. पाटील यांची बदली झाल्याने ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहेत. तहसील कार्यालयाला चार नायब तहसीलदार पदे मंजूर आहेत. सध्या निवडणूक व संजय गांधी नायब तहसीलदार या दोन्ही जागेवर अधिकारी आहेत. गेली दीड वर्षे निवासी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांवर चालला. मूळ कामकाज पाहून अतिरिक्त कामकाज अधिकाऱ्यांना पाहावे लागत आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासनावर दैनंदिन कामकाजाबरोबर महापुरातील कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यामुळे रिक्त जागेवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.