प्रो-लीगमध्ये खेळणार कासेगावचे दोन खेळाडू
By Admin | Updated: July 18, 2015 00:21 IST2015-07-17T22:01:58+5:302015-07-18T00:21:25+5:30
कबड्डी : काशिलिंग करणार पुन्हा ‘दबंगगिरी’, तर रवींद्र ‘पलटन’चा सैनिक

प्रो-लीगमध्ये खेळणार कासेगावचे दोन खेळाडू
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील काशिलिंग आडके व रवींद्र कुमावत हे दोन कबड्डीपटू यावर्षी प्रो लीग कबड्डी स्पर्धेत खेळणार आहेत. काशिलिंग आडके हा ‘दिल्ली दबंग’कडून, तर रवींद्र कुमावत हा ‘पुणेरी पलटन’कडून खेळणार आहे. कुमावतच्या निवडीने कासेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कासेगावला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. आजअखेर या खेळाच्या माध्यमातून शेकडोजण विविध ठिकाणी शासकीय सेवेत नोकरीस लागले आहेत. ‘हनुमान उडी’साठी प्रसिद्ध असलेला काशिलिंग आडके याला मागील वर्षी १0 लाखांची बोली लावत दिल्ली दबंग संघाने खरेदी केले आहे, तर यावर्षी रवींद्र कुमावत यालाही पुणेरी पलटण या संघाने खरेदी करून करारबद्ध केले आहे. रवींद्र व काशिलिंग हे दोघेही गावातील क्रांतिसिंह नाना पाटील मंडळाचे खेळाडू आहेत. रवींद्र हा १४, १७ व १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातून खेळला आहे. सध्या तो कुमार गटात महाराष्ट्र संघात आहे. छत्तीसगढ येथे झालेल्या खुल्या गट स्पर्धेतही तो महाराष्ट्र संघात होता. या संघाचे कर्णधारपद काशिलिंग आडके याने पटकावले होते. सध्या दोघेही खेळाडू आपापल्या संघासोबत प्रो लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे समस्त कासेगावकरांचे लक्ष या दोघांच्या खेळावर राहणार आहे. दोन्ही खेळाडूंना क्रांतिसिंह व्यायाम मंडळाचे प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. (वार्ताहर)
रवींद्र कुमावत हा सध्या कनिष्ठ गटात महाराष्ट्रातील एक नंबरचा खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करीत हाताने व पायाने गुण मिळविण्यात तो पटाईत आहे.