जिल्ह्यासाठी मुलींची दोन नवी वसतिगृहे

By Admin | Updated: May 13, 2016 00:59 IST2016-05-13T00:25:48+5:302016-05-13T00:59:15+5:30

१५ जूनला होणार सुरू : कोल्हापूर शहर, इचलकरंजीचा समावेश

Two new hostels for girls for the district | जिल्ह्यासाठी मुलींची दोन नवी वसतिगृहे

जिल्ह्यासाठी मुलींची दोन नवी वसतिगृहे

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  -शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुलींकरिता दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. कोल्हापूर शहर व इचलकरंजी या ठिकाणी १५ जूनला ती सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येकी १०० जागांच्या क्षमतेची ही वसतिगृहे आहेत.राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काही धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यात ५० वसतिगृहे मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मार्च महिन्यात घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुलींची दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहर व इचलकरंजीचा समावेश आहे. सध्या मुलींची सहा वसतिगृहे असून त्यामध्ये नव्याने दोन वसतिगृहांची भर पडणार असल्याने इतर वसतिगृहांवरील ताण यानिमित्ताने थोडा हलका होणार आहे. कोल्हापूर शहरात सध्या रमणमळा येथे मुलींचे ७५ जागांची क्षमता असलेले वसतिगृह आहे. ते अपुरे पडत असून अनेक महाविद्यालयीन मुलींना प्रवेशासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तसेच काहींना जागा संपल्याने प्रवेशही मिळत नाही. ही अडचण लक्षात घेता शहरात आणखी एका वसतिगृहाला मंजुरी मिळाल्याने मुलींची सोय होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही वसतिगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. शहरातील जागा निश्चित झाली असली तरी जिल्हा समाजकल्याण विभागाने हे ठिकाण अद्याप जाहीर केलेले नाही. इचलकरंजी येथे अद्याप वसतिगृहाच्या जागेसाठी शोध सुरू आहे. समाजकल्याण विभागाने इचलकरंजी नगरपालिकेला पत्र पाठवून आपल्या मालकीच्या जागा असल्यास कळवा, असे सांगितले आहे.
लवकरच जागानिश्चिती होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इचलकरंजी शहरात महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत मुलींना राहायला वसतिगृहे नसल्याने आसपासच्या परिसरातील मुलींची गैरसोय होत आहे. या वसतिगृहाच्या निमित्ताने ती दूर होणार आहे.


मुलांची १० वसतिगृहे
जिल्ह्यात सध्या मुलांची कोल्हापूर शहर, कागल, चंदगड, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले, पन्हाळा, जयसिंगपूर-शिरोळ, राधानगरी या ठिकाणी वसतिगृहे आहेत. शाहूवाडी व गगनबावडा
या ठिकाणी अद्याप वसतिगृहे नाहीत.

मुलींची सहा वसतिगृहे
जिल्ह्यात सध्या मुलींची कोल्हापूर शहर, हातकणंगले, जयसिंगपूर, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा याठीकाणी सहा वसतिगृहे आहेत.


राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्ह्यासाठी मुलींकरिता दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. १५ जूनला ती सुरू होणार आहेत. कोल्हापूरची जागानिश्चिती झाली असून इचलकरंजीसाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच ती मिळेल.
- विजयकुमार गायकवाड,
आयुक्त, समाजकल्याण विभाग

Web Title: Two new hostels for girls for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.