दीपक जाधव कोल्हापूर : कोर्टी मोक्ता (चंद्रपूर) आणि शिसा उदेगाव अकोला येथे भारत राखीव बटालियन ४ व ५ आणि हातनूर-वरणगाव जळगाव येथे राज्य राखीव पोलीस दल क्रमांक १९ ची नव्याने उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी २९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात सध्या औरंगाबाद, गोंदिया, कोल्हापूर येथे भारत राखीव बटालियन आहेत. या बटालियनसाठी केंद्र शासनाकडून निधी पुरविण्यात येतो. कायदा व सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास या बटालियनची मदत होते, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन व एक राज्य राखीव पोलीस बल उभारण्यास मान्यता दिली. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्णातील बल्लारपूर तालुक्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ४ आणि अकोला जिल्ह्यातील मौजे शिसा उदेगाव व हिंगाणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्रमांक ५ ची स्थापना करण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हातनूर-वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ स्थापन करण्यात येत आहे. यामध्ये समादेशक ते बिनतारी संदेश विभागातील पदे ही कायमस्वरूपी, तर प्रमुख लिपिक ते वर्ग चारपर्यंतची सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.१३८० पदे भरणार..उच्चस्तरीय सचिव समितीने केलेल्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक बटालियनसाठी आवश्यक असलेल्या पदांच्या (१३८४) एक तृतीयांश म्हणजेच ४६० अशी तीन बटालियनसाठी एकूण १३८० पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राहिलेली पदे भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस गट प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात येणार आहेत.
राज्यात आणखी दोन भारत राखीव बटालियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:54 IST