पैशांचा पाऊसप्रकरणी आणखी दोघांना अटक
By Admin | Updated: October 20, 2015 00:15 IST2015-10-20T00:10:04+5:302015-10-20T00:15:12+5:30
चार दिवस कोठडी : फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

पैशांचा पाऊसप्रकरणी आणखी दोघांना अटक
इचलकरंजी : जादुटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. शांताराम सोमा गोताड (वय ४४, रा. आसरानगर) व श्रीकांत प्रकाश केसेकर (३२, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शांताराम व श्रीकांत हे दोघेजण गरजू महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून आम्ही पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून महिलांची दिशाभूल करीत होते. यामध्ये फसगत झालेल्या महिलांना टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा भीमराव शिंदे याच्याशी भेट घालून देत होते, अशी या दोघांची या प्रकरणात भूमिका असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात पाचजणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी टोळीचा म्होरक्या भीमराव शिंदे याचा मृत्यू झाला असून, सुरेश स्वामी, हणमंत राऊत, शांताराम गोताड आणि श्रीकांत केसेकर हे पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांतून वर्तविली जात आहे. (वार्ताहर)
टोळीतील आणखी एकजण रुग्णालयात दाखल
सोमवारी अटक केलेल्या गोताड व केसेकर यातील शांताराम गोताड याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने पोलिसांनी उपचारांसाठी तत्काळ आयजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गोताड याला शुगर, बीपीचा त्रास असल्यामुळे त्याचा कार्डिओग्राम काढण्यात आला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक बैठकीचे फुटेज ताब्यात
शुक्रवारी पैशांचा पाऊस पाडण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा लावलेल्या महिलांशी चर्चा करण्यासाठी बसलेल्या या टोळीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.