कोल्हापूर विभागात दोन कोटी टन उसाचे गाळप
By Admin | Updated: August 27, 2014 23:20 IST2014-08-27T22:42:55+5:302014-08-27T23:20:09+5:30
साखर आयुक्तालयाचा अंदाज : मागील हंगामापेक्षा १५ लाख टन उसाचे जादा गाळप

कोल्हापूर विभागात दोन कोटी टन उसाचे गाळप
प्रकाश पाटील- कोपार्डे --पोषक वातावरण व कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत उसाच्या क्षेत्रात झालेली मोठी वाढ यामुळे कोल्हापूर विभागात दोन कोटी टनांपेक्षा जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील हंगामापेक्षा येत्या हंगामात किमान १५ लाख टन जादा उसाचे गाळप होणार आहे.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. हंगाम २०१३-१४ मध्ये १ लाख ४६ हजार २९५ हेक्टर कोल्हापूर जिल्ह्यात, तर सांगली जिल्ह्यात ७४ हजार ४९७ हेक्टरवर उसाच्या क्षेत्राची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार हेक्टर, तर सांगली जिल्ह्यात ४ हजार हेक्टरने मागील हंगामापेक्षा उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
साखर आयुक्तालयाच्या माहितीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ३८ लाख ८९ टन उसाचे उत्पादन होईल, तर सांगली जिल्ह्यात ७० हजार मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.
येत्या हंगामात कोल्हापूर विभागात ४२ हजार ९७६ हेक्टर आडसाली उसाची नोंद झाली आहे. १६.९५ टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे. ८८ हजार हेक्टरवर खोडवा उसाची नोंद आहे. पूर्व हंगामी ऊस लागणीचे ३३ हजार ३३१ हेक्टर क्षेत्राची कोल्हापूर जिल्ह्यात, तर सांगली जिल्ह्यात १४ हजार ६१० हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे.
मागील हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ७६८ हेक्टर क्षेत्रावर, तर सांगली जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसक्षेत्राची नोंद झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांनी व सांगली जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केले होते. कोल्हापूर विभागाने सरासरी १२.६४ च्या उताऱ्याने २ कोटी ३८ लाख १५ हजार १६१ क्विंटल साखर उत्पादित केली होती.या हंगामात कर्नाटक सीमाभागातून मल्टिस्टेट साखर कारखान्यांना ५ ते ७ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात आणखी दोन कारखाने आपले साखर हंगाम सुरू करणार आहेत.