सौरऊर्जेवर चालतात दोन प्रयोगशाळा
By Admin | Updated: June 4, 2016 00:36 IST2016-06-04T00:21:16+5:302016-06-04T00:36:59+5:30
डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग : ‘राजारामबापू अभियांत्रिकी’त सौरऊर्जेचा यशस्वी प्रयोग

सौरऊर्जेवर चालतात दोन प्रयोगशाळा
इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्युत शाखेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांतर्गत १ हजार वॅट क्षमतेची वीज निर्मिती सौरऊर्जेवर केली आहे. त्याचा वापर सध्या दोन प्रयोगशाळांमध्ये करीत आहेत. ही सोलर सिस्टीम प्रति दिन ७ युनिट वीज निर्मिती करीत आहे. तसेच सिस्टीममध्ये सोलरचा प्रवाह व दाब आणि बॅटरी चार्जिंगचा प्रवाह व दाब डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मोजला जात आहे. सोलर सिस्टीमचा वापर करुन मर्यादित ऊर्जास्रोतावरील ताण कमी करण्याच्यादृष्टीने एक आदर्शवत मॉडेल करण्यात आले आहे. याकरिता अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अभिजित पवार, सतीश पाटील, शुभम पवार व अक्षय ढाणे यांनी सौरऊर्जेचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात कसा केला जातो, हे दाखवून दिले. या प्रकल्पाचा निश्चित फायदा होणार आहे. या विद्यार्थ्यांना विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. एच. टी. जाधव, प्रा. सी. एल. भट्टर, मदतनीस ए. एन. जाधव यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ. एस. एच. कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)