कोल्हापूरचे दोघे ताब्यात
By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:41:59+5:302014-08-17T00:44:25+5:30
सिलिंडर काळाबाजार : एजन्सीचे नाव निष्पन्न; संशयितास कोठडी

कोल्हापूरचे दोघे ताब्यात
सांगली : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या सिलिंडरमध्ये भरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुख खतीब यास इलेक्ट्रीक मोटारींचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन व्यापाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज (शनिवार) सायंकाळी ताब्यात घेतले. दरम्यान, खतीबला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून ५० सिलिंडर जप्त करण्यात आले होते. यापैकी २० सिलिंडर सांगलीतील एका गॅस एजन्सीने पुरविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात छापा टाकून बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी खतीबला अटक केली होती. तो भरलेल्या सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरुन देण्याचा व्यवसाय करीत होता. यासाठी त्याने शिवशंभो चौकातील शब्बीर अथणीकर यांची खोली भाड्याने घेतली होती. गॅस भरुन देण्यासाठी तो इलेक्ट्रीक मोटारींचा वापर करीत होता. चार मोटारी जप्त केल्या होत्या. या मोटारी त्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांचे पथक रवाना झाले होते. पथकाने दोघांना सायंकाळी ताब्यात घेतले. रात्री उशिरा पथक सांगलीत दाखल झाले.
दोन्ही व्यापारी मूळचे गुजरातचे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते कोल्हापुरात राहत आहेत. एकाचा वाहनातील गॅसकीटचे स्पेअरपार्ट विक्रीचा, तर दुसऱ्याचा गॅसकीटचे यंत्र दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यायाऱ्यांनी या मोटारी गुजरातमधून आणून खतीबला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तपासाच्याद्दष्टीने त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गॅस भरुन देणारे २५ व्यावसायिक आहेत. या सर्वांना त्यांनीच मोटारींचा पुरवठा केल्याचा संशय आहे. एक मोटार गॅस भरुन देण्यासाठी अर्धा तास सुरु ठेवली, तर ती गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. यामुळे खतीब चार मोटारींचा वापर करीत होता. (प्रतिनिधी)