कार झाडावर आदळून दोन ठार, दोन जखमी
By Admin | Updated: January 5, 2016 00:31 IST2016-01-05T00:31:55+5:302016-01-05T00:31:55+5:30
नाणीज येथे अपघात : मृत पलूस, कोल्हापुरातील

कार झाडावर आदळून दोन ठार, दोन जखमी
रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीकडे निघालेली इंडिका कार नाणीज येथे एका झाडावर जोरदार आदळून दोघेजण जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सव्वाअकरा वाजता हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. वेळेत उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. सचिन सुबराव ठीक (वय ३३, पलूस, सांगली) व विनोद दिलीप माने (३५, जाधववाडी, कोल्हापूर) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, मारुती अशोक डोने (३३, हातकणंगले, जि. कोल्हापूर) व चंद्रकांत सखाराम ठीक (३३, पलूस) हे दोघे जखमी झाले आहेत.
पलूस येथील सचिन ठीक यांचा रत्नागिरीत डंपरचा व्यवसाय आहे. त्यासाठी मेस्त्री आणण्यासाठी ते कोल्हापूरला गेले होते. रविवारी ते मेस्त्रींना घेऊन इंडिकाने (एमएच ०१ एव्ही ७५२०) रत्नागिरीकडे येत होते. नाणीज येथे चालकाचा ताबा सुटल्याने ती कार मेडिकलसमोरील झाडावर जोरदार आदळली. अपघात एवढा जोरदार होता की, गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. पुढे बसलेले दोघेही जागीच ठार झाले.
रात्री तातडीने जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यातून जखमी व मृतांना जिल्हा रुग्णालयात नेले. जखमी दोघांवर तातडीने उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे. सोमवारी नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)