केदारवाडीजवळ दोन ठार
By Admin | Updated: August 2, 2015 00:12 IST2015-08-02T00:09:32+5:302015-08-02T00:12:41+5:30
मोटारीची दुचाकीला धडक

केदारवाडीजवळ दोन ठार
नेर्ले : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर केदारवाडी (ता. वाळवा) येथे शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. जालिंदर पांडुरंग भाकरे (वय ७६, रा. केदारवाडी) व शामराव ज्ञानू सावंत (७०, रा. काळमवाडी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
केदारवाडी येथील वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी जालिंदर भाकरे व काळमवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शामराव सावंत हे दोघे शुक्रवारी भाकरे यांच्या दुचाकीवरून (एमएच १० बीडी ४०२१) औंध (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे गेले होते. रात्री नऊच्या दरम्यान दोघे परतताना केदारवाडीनजीक पाठीमागून आलेल्या व कोल्हापूरकडे चाललेल्या मोटारीने (एमएच ०९ डीए ६५०६) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीसह दोघेही पन्नास फूट फरफटत गेले. ग्रामस्थांनी दोघांनाही कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारचालक बाबूजमाल सरदार किल्लेदार (५३, रा. गांधीनगर, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे. जगन्नाथ सूर्यवंशी यांनी अपघाताची वर्दी दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे पुढील तपास करीत आहेत.
भाकरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, तर सावंत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना असा परिवार आहे. दोघांच्या अपघाती निधनाने काळमवाडी व केदारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)