कोल्हापूर : वाकलेला खांब बाहेर काढण्याचे काम महापालिकेकडून सुरू असताना अचानक खांब जवळून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री मिरजकर तिकटी येथे घडली. संजय भोसले (वय ३२) व जुबेर शेख (वय ३२) (दोघेही रा. कसबा बावडा) हे यात जखमी झाले. यातील भोसले गंभीर जखमी झाले असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वृक्ष कोसळले. काही ठिकाणी विद्युत खांबही कोलमडून पडले. मिरजकर तिकटी येथील अर्चित कॉम्प्लेक्सजवळील विद्युत खांब वाकल्याने काही दुर्घटना होऊ नये म्हणून रात्री महापालिकेच्या विद्युत विभागाने हा खांब बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी क्रेनही आणली. शिवाय फायर ब्रिगेडचा बूमही मागविण्यात आला. रात्री काम सुरू असताना अचानक खांब कोसळला. त्यात रस्त्यावरून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या अंगावर खांब कोसळल्याने दुचाकीस्वार जागेवरच कोसळले. स्थानिकांनी त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, यातील भोसले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, विद्युत खांब अंगावर पडल्याने दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:40 IST