कोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:34+5:302020-12-31T04:24:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धामोड कोते (तालुका राधानगरी) येथे शॉर्टसर्किटमुळे ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ...

कोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड कोते (तालुका राधानगरी) येथे शॉर्टसर्किटमुळे ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता येथील आनंदी रघुनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या राहत्या घराला आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे शेजारील काही घरांचेही किरकोळ नुकसान झाले आहे. या आगीमुळे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कोते गावानजीक असणाऱ्या चव्हाणवाडी वसाहतीतील आनंदी रघुनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या राहत्या घराला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी दोन्ही महिलांनी आरडाओरडा करताच ग्रामस्थांनी घटनास्थळी येत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांना आग विझवणे शक्य झाले नाही. या आगीत धान्य, कपडे, भांडी, लाकडी साहित्य व घर असे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा पोलीस पाटील श्रीकांत कांबळे, तलाठी संदीप हजारे यांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही.
फोटो - कोते ( ता. राधानगरी ) येथील आगीत भस्मसात झालेले घर.
छाया_ श्रीकांत ऱ्हायकर