दोन मित्र येणार आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:30+5:302021-01-08T05:16:30+5:30
दीपक जाधव कदमवाडी : कधीकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणारे ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद सत्यजित कदम आणि काँग्रेसचे दीपक शेळके प्रभाग ...

दोन मित्र येणार आमने-सामने
दीपक जाधव
कदमवाडी : कधीकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणारे ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद सत्यजित कदम आणि काँग्रेसचे दीपक शेळके प्रभाग क्रमांक ९, कदमवाडी या प्रभागातून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे या दोन मित्रांमध्ये होणारी लढत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे ही लढत दोन मित्रांमध्ये असली, तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागणार आहे. गत निवडणुकीत अनुसूचित जाती : महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असलेला कदमवाडी हा प्रभाग यावेळेस सर्वसाधारण झाल्याने या प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रभागावर भाजप-ताराराणी आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही लक्ष केंद्रीत केले आहे. ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक सत्यजित कदम यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने ते प्रभाग क्रमांक ९ मधून भाजप-ताराराणी आघाडीकडून रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. त्यांच्याविरोधात एकेकाळचे त्यांचे मित्र दीपक शेळके हे काँग्रेसकडून मैदानात उतरणार आहेत. २०१७‐१८ मध्ये परिवहन समितीमध्ये शेळके यांना सदस्य म्हणून घेण्यात सत्यजित कदम यांनीच मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध होते. आता मात्र, हे दोन मित्र आमने-सामने येत असल्याने कदमवाडी प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची बनणार आहे. दीपक शेळके हे धनगर समाजाचे असून, या प्रभागात धनगर समाजाचे मतदान लक्षणीय आहे. त्यामुळे हा प्रभाग पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीला प्रयत्न करावे लागणार आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने या प्रभागात राष्ट्रवादीही एकास एक उमेदवार देण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून सत्यजित शिरवळकर हेही राष्ट्रवादीकडून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक आहेत.
सोडवलेले नागरी प्रश्न : कपूर वसाहतीतील द्वारकानाथ कपूर रुग्णालयाचे नूतनीकरण, पालिका हाॅलचे नूतनीकरण, स्मशानभूमीचे नूतनीकरण, काटे मळा, यशोदा पार्क रस्त्यांचे काँक्रिटीकरण, धनगर समाजासाठी सह्याद्री हौसिंग सोसायटीत हाॅल उभारणी, कपूर वसाहत येथे अंतर्गत विद्युत वाहिनी पूर्ण.
रखडलेले प्रश्न : पूरबाधित भागातील रस्ते अपूर्ण, घरकुल योजनेंतर्गत अनुदान रखडले, भागात अमृत योजना अपुर्ण, प्रापर्टी कार्ड अपूर्ण.
कोट : पूरग्रस्त भागातील रस्त्यासाठी अनुदान मिळाले नसल्याने त्या भागातील काही रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम राहिले आहे. बी टेेेेन्युअर प्राॅपर्टी कार्डचे काम अपूर्ण आहे.
कविता माने, नगरसेविका
गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार. कविता माने १६८९ भाजप-ताराराणी (विजयी), आरती आवळे ८६९ राष्ट्रवादी, विमल गौडदाब ८५ शिवसेना, उज्वला चौगुले ४१ काँग्रेस
फोटो ०५ प्रभाक क्रमांक ९
प्रभागातील सह्याद्री हौसिंग सोसायटीमध्ये अंतर्गत रस्त्यासह पाण्याच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे. (छाया - दीपक जाधव)