‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

By Admin | Updated: August 2, 2014 00:21 IST2014-08-02T00:06:20+5:302014-08-02T00:21:16+5:30

पंचगंगा इशारा पातळीकडे : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Two doors of 'Radhanagari' opened | ‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

कोल्हापूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज, शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता उघडले आहेत. या दोन दरवाजांतून प्रतिसेकंद ४८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आगेकूच सुरू आहे.
आज दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. शहरात दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. परंतु, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. आज सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी राधानगरी धरणाचे क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे उघडले. यातून प्रतिसेकंद ४८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी वारणा धरणातून प्रतिसेकंद १० हजार ९३४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पातळीत वाढ झाली. परिणामी, पंचगंगेची पातळी फुगली आहे. दूधगंगा धरण ७० टक्के भरले असून, कासारी ९८ टक्के भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिला, तर उद्या, शनिवारी वारणा धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी ३६.७ फूट होती. सायंकाळी सहा वाजता ती ३७.१० फुटांपर्यंत वाढली. रात्री बारानंतर पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून, पाऊस, पुराचे पाणी यासह विविध कारणाने तब्बल ४० मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एस.टी.चे सहा मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस-
करवीर-२२.१४, कागल-१७.७२, पन्हाळा-४५.२५, शाहूवाडी-१०९, हातकणंगले-१८.०६, शिरोळ-११.८५, राधानगरी-४०.६७, गगनबावडा-११५, भुदरगड-३५, आजरा-३५.२५, चंदगड-२२.८३. (प्रतिनिधी)
राधानगरी : गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेले राधानगरी धरण आज, शुक्रवारी पूर्ण क्षमतेने भरले. सायंकाळी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी तीन व सहा क्रमांकांचे दोन दरवाजे उघडले. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. गतवर्षीच्या तुलनेत पावसाने दीर्घकाळ हुलकावणी देऊनही केवळ नऊ दिवस उशिरा धरण भरले. गतवर्षी २३ जुलैला धरण भरले होते. या धरणाची संचय क्षमता ८.३६ टीएमसी आहे. ३४७.५० फुटांवर पाणीपातळी गेल्यावर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात. पाणलोट क्षेत्रात आज पावसाचे प्रमाण कमी होते. शिवाय, धरणस्थळावरील दोन्ही जलविद्युत निर्मिती केंद्रांतून दोन हजार क्युसेक्स जलविसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा दाब नव्हता. परिणामी ही प्रक्रिया लांबली. मात्र, सायंकाळी सहानंतर पावसाचा जोर वाढल्याने सव्वासात वाजता धरणाचे दरवाजे उघडले. आज सकाळी आठ वाजता येथे १४२ मिलिमीटर व एकूण २८५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. स्वयंचलित दरवाजे व वीजनिर्मिती केंद्रातून नदीपात्रात ४८०० क्युसेक्स विसर्ग होत आहे.
कुरुंदवाड : गेले दोन दिवस चालू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा-पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, दुसऱ्यांदा पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिरोळ बंधारा व कुरुंदवाड अनवडी पुलावर पाणी आल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कुरुंदवाड-शिरोळ जुन्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
साळगाव बंधारा दोन दिवस पाण्याखाली
पेरणोली : हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुरामुळे साळगाव (ता. आजरा) येथील बंधारा दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहे. पर्यायी सोहाळे मार्गावरून आजरा आगाराने वाहतूक सुरू केली आहे. पेरणोली, साळगाव, हरपवडे, देवकांडगाव, कोरीवडे, वझरे, आदी गावांची आजऱ्याकडे सोहाळे मार्गावरून वाहतूक सुरू आहे. आठ दिवसांतील मुसळधार पावसामुळे आठवड्यात दोनवेळा बंधारा पाण्याखाली गेला आहे.

Web Title: Two doors of 'Radhanagari' opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.