कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे खासगी क्लास संपल्यानंतर घरी जाताना खेळता खेळता रस्त्याकडेच्या नाल्यात पडल्याने दोघे सख्खे भाऊ वाहून गेले. यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला, तर छोट्या भावाला वाचविण्यात यश आले. केदार मारुती कांबळे (वय ११) असे मृताचे नाव आहे. लहान भाऊ जेम्स मारुती कांबळे (वय ८, दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) हा सुदैवाने बचावला. ही घटना शनिवारी (दि. २७) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.घटनास्थळ आणि सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, फुलेवाडी रिंगरोड परिसरात दत्त कॉलनी येथे राहणारे मारुती कांबळे गवंडी काम करतात. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते, तर त्यांची पत्नी लहान मुलाला सोबत घेऊन देवदर्शनासाठी गेली होती. केदार आणि जेम्स हे दोघे खासगी क्लासला गेले होते.क्लास सुटल्यानंतर घरी परत जाताना अहिल्याबाई होळकर नगर येथे शिवतेज तरुण मंडळाजवळ खेळता खेळता दोघे रस्त्याकडेच्या नाल्यात पडले. संततधार पावसामुळे नाला दुथडी भरून वाहत होता. दोघेही पाण्याच्या प्रवाहाने सुमारे ३० ते ३५ फूट वाहत गेले. त्यांनी आरडाओरडा करताच परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात आला.नागरिकांनी धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाह जास्त असल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत होती. काही तरुणांनी सिमेंटचे पत्रे नाल्यात घालून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले.
यातील केदार बेशुद्धावस्थेत होता, तर जेम्स अत्यवस्थ होता. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान केदारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, तर लहान भावाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेने कांबळे कुटुंबीयांनी सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर हंबरडा फोडला.
Web Summary : Two brothers in Kolhapur fell into a drain while playing after class. One brother, 11, died, while the other, 8, was rescued. Heavy rain contributed to the accident near Phulewadi Ring Road.
Web Summary : कोल्हापुर में क्लास के बाद खेलते समय दो भाई नाले में गिर गए। 11 वर्षीय एक भाई की मौत हो गई, जबकि 8 वर्षीय दूसरे को बचा लिया गया। फुलेवाड़ी रिंग रोड के पास भारी बारिश के कारण दुर्घटना हुई।