दोघा फरार चेन स्नॅचरना अटक
By Admin | Updated: June 10, 2014 02:10 IST2014-06-10T01:56:49+5:302014-06-10T02:10:53+5:30
कोल्हापूरसह कर्नाटकात ३५ गुन्हे : गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

दोघा फरार चेन स्नॅचरना अटक
कोल्हापूर : कोल्हापूर व कर्नाटकात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईलने लंपास करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघा फरार चेन स्नॅचरना आज, सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी आनंद ऊर्फ राजू मारुती वंटगुडे (वय ४९, रा. जलालपूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) व अब्दुलगफार ऊर्फ सादीक अब्दुलसत्तार पिरजादे (४२, रा. बासेबान दर्गा, भेंडी बझार, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
फरार आरोपी आनंद वंटगुडे व अब्दुलगफार पिरजादे या दोघांनी १९९५-९६ मध्ये मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा सपाटाच लावला होता. त्यांच्याविरोधात १९९५ ते २००६ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी, राजारामपुरी, कागल, गडहिंग्लज, तसेच कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, आदी पोलीस ठाण्यांत सुमारे ३५ गुन्हे दाखल आहेत. ते न्यायालयातून जामिनावर मुक्त होऊन पसार झाले होते. त्यांचा कोल्हापूर व कर्नाटक पोलीस शोध घेत होते. ते आपले अस्तित्व व ओळख लपवून कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी वास्तव्य करीत होते. दरम्यान, हे दोघे आपल्या घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना समजताच त्यांनी तातडीने बेळगावला पथक रवाना केले आणि आज दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांनी त्यांना जलालपूर येथील घरातून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)